'हे घ्या पुरावे', इंदोरीकरांवर कारवाईसाठी अंनिसचा जिल्हा शल्यचिकित्सकांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांना इंदोरीकर महाराजांविरोधात पुरावे देऊन 15 दिवसात कारवाईची मागणी केली आहे.

'हे घ्या पुरावे', इंदोरीकरांवर कारवाईसाठी अंनिसचा जिल्हा शल्यचिकित्सकांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांना इंदोरीकर महाराजांविरोधात पुरावे देऊन 15 दिवसात कारवाईची मागणी केली आहे (ANIS on legal action against Indorikar Maharaj). जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी कारवाई करण्यात कसूर केल्याचाही आरोप अंनिसने यावेळी केला आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही सहआरोपी करण्याचा इशारा अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव रंजना पगार-गवांदे यांनी दिला आहे.

रंजना पगार-गवांदे म्हणाल्या, “निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वादग्रस्त विधान करुन 22 दिवस उलटले आहेत. तरीही अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. जर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर 15 दिवसांनंतर इंदोरीकर महाराजांसोबत जिल्हा शल्यचिकित्सकांनाही आरोपी करत न्यायालयात खटला दाखल करु.”


‘पुरावे नाही म्हणणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पुरावे सादर’

गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत आलेय. काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र, सायबरसेलने तो व्हिडीओ युट्युबला नसल्याचं PCPNDT समितीला सांगितलं. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना काहीसा दिलासा मिळाल्याचं समोर आलं. मात्र, आता अंनिसने पुढाकार घेत इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुरावे सादर केले आहेत. तसेच तात्काळ इंदोरीकर महाराजांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

अंनिसच्या बुवाबाजी विभागाच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापुसाहेब गाडे यांना याबाबत कायदेशीर नोटीस दिली आहे. याआधी मागणी पत्र देऊनही कोणतीही कारवाई न केल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांना कायदेशीर नोटीस दिल्याची माहिती पगार-गवांदे यांनी दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोपही केला आहे. आता पुरावेच नाही म्हणत इंदोरीकर महाराजांवर कारवाई करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना अंनिसने थेट पुरावेच दिल्याने आता ते काय काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.

इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर महाराज म्हणाले होते, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

ANIS on legal action against Indorikar Maharaj

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *