वडाच्या अध्यक्षेखालील वृक्ष संमेलनाचा समारोप, प्रत्येक पक्षाचा आवाज काढणाऱ्या अवलियाचीही हजेरी

देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाचं आज (14 फेब्रुवारी) सूप वाजलं. 2 दिवस चालणाऱ्या या वृक्ष संमेलनात बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील नागरिकांनी हजेरी लावली.

वडाच्या अध्यक्षेखालील वृक्ष संमेलनाचा समारोप, प्रत्येक पक्षाचा आवाज काढणाऱ्या अवलियाचीही हजेरी

बीड : देशातील पहिल्या वृक्ष संमेलनाचं आज (14 फेब्रुवारी) सूप वाजलं. 2 दिवस चालणाऱ्या या वृक्ष संमेलनात बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील नागरिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे संमेलनाचं अध्यक्षपद वडाच्या झाडाकडे होतं. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली, तर वन्यजीव गिधाड पक्षाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून संमेलनाचा समारोप करण्यात आल. संमलेनाला निसर्गाच्या सानिध्यात वावरणाऱ्या आणि प्रत्येक पक्षाचा आवाज काढू सकणाऱ्या सुमेध वाघमारेने देखील हजेरी लावली.

बीडच्या पालवण येथे अनोख्या अशा वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाची निसर्गाच्या सानिध्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगता करण्यात आली. बीड जिल्ह्यातीलच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. पहिल्यांदाच अनोखं वृक्ष संमेलन पार पडल्यामुळे इथं आलेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या झाडांसह वनस्पतींची देखील माहिती देण्यात आली. केंद्राच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी देखील या संमेलनाला हजेरी लावली. त्यामुळे संमेलनाची महती आणखीनच उठून दिसली. दिवस-रात्र डोळ्यात तेल ओतून देशातील नागरिकांची सुरक्षा करणारे संरक्षण अधिकारी किरण सानप यांनी यावेळी ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ असा संदेश दिला.


या संमेलनाला खरी बहार आली ती म्हणजे एका अवलियामुळे. मूळचा हिंगोलीचा हा अवलिया त्याचं नाव सुमेध वाघमारे. लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वावरणाऱ्या सुमेधमध्ये अनेक कलागुण आहेत. सुमेध प्रत्येक पक्षाचे आवाज काढतो. या अवलियाने तब्बल 6 तास देवराईत फिरून पक्षांचे आवाज काढत जनजागृती केली.

एरवी चित्रपटात आणि चंदेरी दुनियाच्या पडद्यावर आपण सयाजी शिंदे यांना खलनायकाच्या भूमिकेत पाहात आलो आहे. मात्र, त्यांच्यातील वृक्षप्रेमी कोणीच पाहिला नाही. या निमित्ताने त्यांच्यातील हे वृक्षप्रेम आणि त्यासाठीची धडपड सर्वांनाच पाहायला मिळत आहे. सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने बीडमध्ये सह्याद्री वनराई फुलवण्यात आली. लोकांनी देखील याला जोपासण्याची गरज असल्याची भावना यावेळी शिंदे यांनी बोलून दाखवली.

आपल्या राज्याने अनेक संमेलनं पाहिली आहेत. संमेलनाचे वाद देखील पाहिले. मात्र, या वृक्ष संमेलनात ना कोणता वाद होता, ना कोणता संघर्ष. या ठिकाणी केवळ वृक्ष संवर्धनाची एक अनोखी चळवळ पाहायला मिळाली. संमेलनाचं अध्यक्षपद वडाच्या झाडाला देऊन अध्यक्षपदाचा वादही निकालात काढण्यात आला. या अनोख्या उपक्रमाने चांगला आदर्श समोर ठेवला आहे. अशीच वृक्ष संमेलनं प्रत्येक जिल्ह्यात झाली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निसर्गाचं जतन होईल यात शंका नाही. त्यामुळेच या अनोख्या वृक्ष चळवळीला टीव्ही 9 चा सलाम..!

Vruksha Sammelan in Beed

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *