Arun Jaitley |  माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन 

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ताठ ठेवण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावणाऱ्या अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं आज निधन  झालं.

Arun Jaitley |  माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन 

Arun Jaitley नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ताठ ठेवण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावणाऱ्या अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं आज निधन  झालं. वयाच्या 66 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी अखेरच श्वास घेतला.  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. फुप्फुसातील संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अरुण जेटली यांनी विरोधी पक्षनेता, अर्थमंत्री, कायदेमंत्री, आणि जलवाहतूक मंत्री यांसारखी अनेक महत्त्वाचे मंत्रीपद सांभाळली.

अरुण जेटली यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी एम्समध्ये जाऊन विचारपूस केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनीही एम्समध्ये जाऊन जेटलींची विचारपूस केली. त्याशिवाय  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटलींच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी एम्समध्ये जाऊन विचारपूस केली होती.

15 दिवस मृत्यूशी झुंज

अरुण जेटली हे गेले 15 दिवस अक्षरश: मृत्यूशी झुंज देत होते. अरुण जेटलींच्या प्रकृतीबाबत स्पष्ट कोणी बोलण्यास तयार नव्हतं. मात्र वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जेटलींना मधुमेह अर्थात डायबेटीजही होता. त्यात त्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. शिवाय त्यांना पेशींचा कर्करोगही झाला होता. त्याआधी त्यांच्यावर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही शस्त्रक्रिया झाली होती.

लढवय्या नेता

वडील पेशाने वकील असल्याने त्यांच्यात तो सभाधीटपणा, वाक्चातुर्य, लढवय्या स्वभाव, नेतृत्व गुण आपोआप आले. त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्लीतील सेंट जेवियर्समध्ये झालं. पुढे दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. 1974 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापिठातून कायदा शाखेतील पदवी मिळवली. सोबतच अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचं अध्यक्ष पदही भूषवलं. याच काळात त्यांच्यातील नेतृत्व गुण समोर आले आणि त्यांचा त्यांनी विद्यार्थांच्या उत्कर्षासाठी अत्यंत खुबीने वापर केला.

अरुण जेटली यांचा अल्पपरिचय

28 डिसेंबर 1952 रोजी जन्म, दिल्लीतच शिक्षण झालं. विद्यार्थी दशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवा नेता म्हणून ओळख मिळवली.

दिल्ली विद्यापीठात एबीव्हीपीकडून विद्यार्थी नेता म्हणून 1974 ला निवड करण्यात आली, आणीबाणीच्या काळात 19 महिने तुरुंगवास भोगला. 1973 मध्ये राज नारायण आणि जेपी नारायण यांनी भ्रष्टाचाराविरोधात उघडलेल्या मोहिमेत जेटली एक प्रमुख युवा नेते होते.

आणीबाणीनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर अरुण जेटलींनी जन संघात प्रवेश केला.

चार्टर्ड अकाऊंटंट होण्याची इच्छा असलेले जेटली वकील झाले. सुप्रीम कोर्ट आणि देशातील विविध हायकोर्टांमध्ये त्यांनी वकिली केली. 1990 मध्ये त्यांनी दिल्ली हायकोर्टाने वरिष्ठ वकील म्हणून मान्यता दिली.

व्ही. पी. सिंह सरकारकडून 1989 मध्ये जेटलींची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून निवड करण्यात आली. बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली.

जनता दलचे नेते शरद यादव, काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी जेटलींनी वकिलीही केली.

पेप्सिको विरुद्ध कोकाकोला हे प्रकरणही जेटलींनी हाताळलं. कायदेमंत्री असताना जेटलींनी पेप्सीकोसाठी खटला लढवला आणि हिमालयातील रस्त्यांवर जाहिरात करणाऱ्या आठ कंपन्यांना दंड ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

जेटलींनी 2009 मध्ये वकिली थांबवली. राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.

भाजपमध्ये अनेक पदांवर जेटलींनी काम केलं. 2014 पर्यंत ते जनतेमधून कोणतीही निवडणूक लढले नव्हते. पण 2014 मध्ये त्यांनी अमृतसरमधून निवडणूक लढले आणि काँग्रेसचे तेव्हाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडण्यात आलं.

निष्णात वकील असलेले जेटली सभागृहात विरोधकांना तोंड देण्यासाठी एकटेच पुरेसे ठरत असत. मोदी सरकारच्या काळात त्यांनी अर्थमंत्रीपद सांभाळताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी काही वेळा सांभाळली.

नोटाबंदी, जीएसटी हे जेटलींच्या काळातील महत्त्वाचे निर्णय ठरले.

एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपद ने देण्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी विश्रांती घेणं पसंत केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *