देशाच्या पहिल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी जनरल बिपीन रावत, या पदाची 8 वैशिष्ट्ये

देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (CDS) नावाची घोषणा झाली आहे (First Chief of Defence Staff).

देशाच्या पहिल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी जनरल बिपीन रावत, या पदाची 8 वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (CDS) नावाची घोषणा झाली आहे (First Chief of Defence Staff). सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना देशाचे पहिले सीडीएस बनण्याचा मान मिळाला आहे. वायूदल, नौदल आणि भूदल या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सीडीएस या पदाची निर्मिती केल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे (First Chief of Defence Staff). मंगळवारी (31 डिसेंबर) जनरल बिपीन रावत सैन्य दलाच्या प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. त्याआधीच याची घोषणा करण्यात आली आहे.

सीडीएस (CDS) पदावरील अधिकारी ‘फोर स्टार जनरल’ असेल. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी असेल. संबंधित अधिकारी आपल्या वयाच्या 65 वर्षांपर्यंत पदावर राहू शकेल. आधी या पदाची वयोमर्यादा 62 वर्षांची होती. मात्र, नंतर सरकारने यात बदल करुन वयमर्यादा 65 केली.

CDS ची नियुक्ती युद्धाच्या काळात एकाच वेळी समन्वय साधून तिन्ही दलांना योग्य आदेश देण्याच्या कामात महत्त्वाची मानली जाते. यामुळे युद्धाची स्थिती पाहून एकाचवेळी तिन्ही दलांना आदेश देता येणार आहे. त्यामुळे यात समन्वयाचा कोणताही अभाव राहणार नाही, असा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पदाची शिफारस केली होती.

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची 8 वैशिष्ट्ये

1. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ थेट पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करेल
2. प्रोटोकॉलनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सर्वात वरती असेल
3. संरक्षण विषयक मुद्द्यांवर सरकारचा ‘सिंगल पॉईंट अॅडवायझर’ असेल
4. सुरक्षेशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी तिन्ही दलांमधील समन्वय साधेल
5. संरक्षण आणि धोरणात्मक मुद्द्यांवर ‘एकिकृत सैन्य सल्लागार’ म्हणून काम पाहिल
6. युद्धाच्या काळात तिन्ही दलांमध्ये परिणामकारक समन्वय साधण्याचं काम करेल
7. संरक्षण विषयक मुद्द्यांवर तिन्ही दलांकडून ‘सिंगल विंडो’ सल्ला घेणार
8. तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असणाऱ्या चिफ ऑफ स्टाफ कमिटीचा (COSC) प्रमुख म्हणून काम पाहिल

1999 मध्ये कारगिल युद्धानंतर उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ऑफ मिनिस्टर्सने (GOM) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची शिफारिस केली होती. तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय राहावा हा यामागे हेतू होता. या समितीने कारगिल युद्धादरम्यान तिन्ही दलांमध्ये ताळमेळ नसल्याचं निरिक्षण नोंदवलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *