भारत अंतराळात ताकद दाखवणार, हजारो फुटांवर युद्धाचा सराव होणार

मार्च महिन्यात भारताने अँटी सॅटेलाईट ASAT चं यशस्वी परीक्षण केलं होतं. त्यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे टाकत स्वतःची ताकद सिद्ध करणार आहे.

भारत अंतराळात ताकद दाखवणार, हजारो फुटांवर युद्धाचा सराव होणार

नवी दिल्ली : अंतराळात चीनचा वाढता दबदबा पाहता भारत पहिल्यांदाच अंतराळात युद्धाचा सराव करणार आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात हा सराव होईल, ज्यात भारताकडून अंतराळातही शक्तीप्रदर्शन केलं जाईल. मार्च महिन्यात भारताने अँटी सॅटेलाईट ASAT चं यशस्वी परीक्षण केलं होतं. त्यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे टाकत स्वतःची ताकद सिद्ध करणार आहे.

indSpaceEx असं या युद्धअभ्यासाचं नाव असेल. या युद्धसरावात सैन्य अधिकाऱ्यांसोबत अंतराळ शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील संशोधकांचाही सहभाग असेल. हा एक टेबल टॉप युद्ध अभ्यास असेल, ज्याचं आयोजन संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाकडून केलं जाईल.

चीनने नुकतंच पिवळ्या समुद्रातून एक उपग्रह आणि एक रॉकेट लाँच केलं होतं. याविषयी जास्त माहिती अजून समोर आलेली नाही. पण अंतराळात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने चीनचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जातं. चीनने अँटी सॅटेलाईट मिसाईल 2007 मध्येच लाँच केलं होतं. पण नुकत्याच लाँच केलेल्या मिसाईलसाठी समुद्रात एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता.

indSpaceEx मिशनशी संबंधित असलेल्या सैन्य अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ए-सॅट मिसाईलच्या यशस्वी चाचणीनंतर भारतही अंतराळ महाशक्ती असलेल्या देशांच्या यादीत आला आहे. त्यामुळे अंतराळात आपल्या संसाधनांची सुरक्षाही आता महत्त्वाची बनली आहे. या वॉर गेमच्या माध्यमातून भारताला स्वतःची ताकद सिद्ध करण्याची संधी मिळेल.

भारताने नुकतंच अंतराळ संरक्षण एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीकडून भारताच्या सॅटेलाईट्सच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली जाईल. यामध्ये भूदल, नौदल आणि वायूदलाचेही अधिकारी आहेत. या एजन्सीचं मुख्यालय बंगळुरुमध्ये असण्याची शक्यता आहे. वायूसेनेचा एअर व्हॉईस मार्शल रँकचा अधिकारी प्रमुख असेल. भविष्यात या एजन्सीला अमेरिका आणि चीनच्या धरतीवर स्पेस कमांडचं स्वरुप दिलं जाईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *