डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, वकील संजीव पुनाळेकर यांना अटक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:11 PM, 25 May 2019

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने सनातनचे वकील संजय पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना अटक केली आहे. या दोघांनाही मुंबईतून अटक करण्यात आली. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने यापूर्वी केला होता. 2016 मध्ये सनातनशी संबंधित असलेल्या वीरेंद्र तावडेवर आरोपपत्रही दाखल झालं होतं. गेल्या वर्षी सीबीआयने काही महत्त्वाच्या व्यक्तींना अटक केल्यानंतर तपासाला वेग आलाय. त्यात आता पुनाळेकर यांची अटक मोठी घडामोड मानली जात आहे.

पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असंही समोर आलं होतं.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तुलांची विल्हेवाट लावल्याचा दावाही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.