हातकणंगले आणि चंदगड नगरपंचायतमध्येही महाविकास आघाडी विजयी

जिल्ह्यातील हातकणंगले आणि चंदगड नगरपंचायतसाठी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.

Hatkanangale and Chandgad Nagar Panchayat Elections, हातकणंगले आणि चंदगड नगरपंचायतमध्येही महाविकास आघाडी विजयी

कोल्हापूर : कोल्हापुरातील हातकणंगले आणि चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. चंदगडच्या आघाडीच्या नगराध्यक्षपदी प्राची कानेकर विजयी झाल्या, तर हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक सात जागा मिळवल्या. मात्र, इथे नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अरुण जानवेकर विराजमान झाले. या दोन्ही नगरपंचायतीच्या निकालावरून मतदारांनी भाजपला पुन्हा एकदा नाकाल्याचं चित्र आहे.

एका बाजूला आज (30 डिसेंबर) महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातही महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उधळला जात होता. जिल्ह्यातील हातकणंगले आणि चंदगड नगरपंचायतसाठी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं.

चंदगड नगरपंचायतमध्ये 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल 10 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राची कानेकर यांनी भाजपच्या समृद्धी कानेकर यांचा पराभव केला. हातकणंगले नगरपंचायतमध्ये स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेने सर्वाधिक सात जागा मिळवल्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला केवळ पाच जागा जिंकता आल्या. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी एकच जागा मिळवता आली असली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र काँग्रेसने बाजी मारली. नगराध्यक्ष पदाची माळ काँग्रेसच्या अरुण जानवेकर यांच्या गळ्यात पडली. इथे तीन अपक्षांनाही मतदारांनी आपली पसंती दर्शवली.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ कोल्हापूर महानगरपालिकेच्या निमित्ताने पाच वर्षांपूर्वी रोवली गेली होती. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे समीकरण जिल्ह्यासाठी नवीन नाही. पण भाजपला रोखण्यासाठी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातही भाजपला सत्तेपासून दूर केल्याची चर्चा आहे.

Hatkanangale and Chandgad Nagar Panchayat Elections

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *