बीडमध्ये तलावातील गाळात 74 वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष

बीड : भीषण दुष्काळात बीड जिल्हा होरपळून निघत आहे. अशास्थितीत लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु असताना गाळात विमानाचे अवशेष आढळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. राज्यभरात मान्सून येण्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हा प्रकार आष्टी तालुक्यातील रुटी प्रकल्पातील आहे. या प्रकल्पातील गाळ काढताना 74 वर्षांपूर्वी कोसळलेल्या …

बीडमध्ये तलावातील गाळात 74 वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष

बीड : भीषण दुष्काळात बीड जिल्हा होरपळून निघत आहे. अशास्थितीत लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु असताना गाळात विमानाचे अवशेष आढळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

राज्यभरात मान्सून येण्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हा प्रकार आष्टी तालुक्यातील रुटी प्रकल्पातील आहे. या प्रकल्पातील गाळ काढताना 74 वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. यापूर्वी 2013 च्या दुष्काळात या प्रकल्पात विमानाचा पंखा सापडला होता. यावेळी संपूर्ण प्रकल्प कोरडा पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरु केले. या कामादरम्यान संपूर्ण विमानाचा सांगाडा सापडला आहे.

सांगडा साडलेले विमान ब्रिटिश सैन्याचे असून ते जुलै 1945 रोजी भरकटले होते. त्यामुळे विमानाचे आपतकालीन लँडिंग करावे लागले. त्यानंतर ते या तलाव प्रकल्पात पडले होते. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला, तर दुसरा उडी मारल्याने वाचला होता. या घटनेची माहिती परिसरातील  गावकऱ्यांना समजताच त्यांनी तलावाकडे धाव घेत विमान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी तब्बल 16 बैल आणि बैलगाड्या आणून विमान काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विमान गाळात फसल्याने ते बाहेर निघू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सैन्यही तेथे पोहचले आणि क्रेनच्या साहाय्याने विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विमानाचा अर्धाच भाग तुटून बाहेर आला. अर्धा भाग तसाच गाळात फसल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.

विमानाचे अवशेष आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी याची माहिती लघुपाट बंधारे विभागाला दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आढळलेल्या विमानाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी महसूल विभागासह सैन्य दलाला देखील पत्रव्यवहार केल्याचे लघुपाट बंधारे अधिकारी देवेंद्र लोहकरे यांनी सांगितले.

आढळलेल्या विमानाचे अवशेष प्रशासनाच्या ताब्यात आहेत. सदर विमान ब्रिटिशांचे होते, की भारतीय सैन्य दलाचे होते. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, विमानाचे अवशेष पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *