कोरोनाग्रस्त भावाविषयी रुग्णाची लपवाछपवी, नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंटाईन

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतल्यावर त्याच्या भावावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं लक्षात आलं. (Corona Nagpur Doctors Quarantine)

कोरोनाग्रस्त भावाविषयी रुग्णाची लपवाछपवी, नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टर क्वारंटाईन

नागपूर : नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अर्धांगवायूच्या रुग्णाने कोरोना पॉझिटिव्ह भावाविषयीची माहिती लपवून ठेवल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. (Corona Nagpur Doctors Quarantine)

नागपूरच्या शासकीय रुग्णालयात अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या रुग्णाचा भाऊ कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. मात्र या रुग्णाने ही माहिती लपवून ठेवल्याने त्याच्यावर सर्वसाधारण रुग्णाप्रमाणे उपचार करण्यात आले.

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतल्यावर त्याच्या भावावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं लक्षात आलं. त्याची ‘कोरोना’ चाचणी केली असता हा रुग्ण आणि त्याची पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह निघाले.

आता रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिका, डॉक्टर आणि इतर व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सध्या नागपुरात कोरोनाचे 16 रुग्ण आहेत. त्यापैकी बरे झालेल्या चार रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिला होता.

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले.

नागरिक गर्दी करत असल्यामुळे कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठवता शहरातील विविध भागात पाठवण्यात येतील.

Corona Nagpur Doctors Quarantine

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *