रिलायन्स शहिदांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत जबाबदारी घेणार

मुंबई : एकी काय असते हे भारताने जगाला दाखवून दिलंय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या जवानांचे कुटुंबीय एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत संपूर्ण देश खांद्याला खांदा लावून उभा आहे हे प्रत्येकाने दाखवून दिलंय. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाऊंडेशननेही शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंतची …

रिलायन्स शहिदांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत जबाबदारी घेणार

मुंबई : एकी काय असते हे भारताने जगाला दाखवून दिलंय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या जवानांचे कुटुंबीय एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत संपूर्ण देश खांद्याला खांदा लावून उभा आहे हे प्रत्येकाने दाखवून दिलंय. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाऊंडेशननेही शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंतची जबाबदारी स्वीकारण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन पुढे सरसावली आहे.

शहिदांना मानवंदना म्हणून त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी, तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासह नोकरीपर्यंतची जबाबदारी स्वीकारण्यास रिलायन्स फाऊंडेशन तयार आहे. गरज पडल्यास, प्रत्येक उपचारासाठी आमची रुग्णालयेही तयार आहेत. सरकार आमच्यावर जी जबाबदारी देईल ती पार पाडणं हे आम्ही कर्तव्य समजतो, असं रिलायन्स फाऊंडेशनने म्हटलंय.

दहशतवादाशी लढण्यासाठी भारत सज्ज आहेच. पण भारताच्या एकात्मतेला कुणीही धक्का पोहोचवू शकत नाही, असंही रिलायन्स फाऊंडेशनकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलंय. रिलायन्स फाऊंडेशन ही मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजची संस्था असून नीता अंबानी या संस्थेच्या चेअरमन आहेत. रिलायन्सकडून आतापर्यंत देशातील 13500 शहरं आणि गावांमधील जवळपास दोन कोटी लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन प्रत्येक शहिदांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देणार

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येक जण पुढे सरसावलाय. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. ही मदत कुटुंबीयांपर्यंत कशी पोहोचवता येईल याबाबत सध्या बिग बी विचार करत असल्याचं समजतंय. याशिवाय विविध राज्य सरकारांकडूनही शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलंय.

महाराष्ट्रातील दोन जवान शहीद

पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. यामध्ये बुलडाण्याचे जवान संजय राजपूत आणि जवान नितीन राठोड शहीद झाले. महाराष्ट्र सरकारने या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर या दोन्ही जवानांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उत्तर प्रदेश :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 12 जवान शहीद झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकरने प्रत्येकी 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

आसाम :

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. त्यांनी आसाममधील शहीद सीआरपीएफ जवान मुनेश्वर बासुमतरी यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुनेश्वर बासुमतरी यांच्या बलिदानाला देश कधीही विसरणार नाही असेही सोनोवाल म्हणाले.

राजस्थान :

राजस्थानचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. शहीद जवान रोहिताश लांबा, शहीद जवान हेमराज मीणा, शहीद जवान जीतराम गुर्जर, शहीद जवान भागीरथ कसाना आणि शहीद जवान नारायण लाल गुर्जर असे या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांची नावे आहेत. या शहिदांच्या कुटुंबियांना राजस्थान सरकारने प्रत्येकी 25 लाख रुपये आणि कुटुंबियांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शहीद जवानांच्या पत्नींना, त्यांच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या मुलांनाही अनेक सवलती देण्यात येणार आहेत.

ओदिशा :

या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 37 जवानांपैकी दोन जवान हे ओदिशाचे होते. प्रसन्ना साहू आणि मनोज बेहेरा अशी शहीद जवानांची नावे आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबाला ओदिशा सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबतची घोषणा केली.

वाचापुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं

झारखंड :

झारखंडचे जवान विजय सोरेंगे हेदेखील या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी शहीद जवान विजय सोरेंगे यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत आणि नातेवाईकांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

हिमाचल प्रदेश :

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या हल्ल्यात शहीद झालेले जवान तिलक राज यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. तसेच कुटुंबातील एका व्यक्तिला त्याच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्यात येईल अशी घोषणा केली.

त्रिपुरा :

त्रिपुरा सरकारने शहीदांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *