पाच वर्षांचं रिलेशनशीप, रिचा चढ्ढा-अली फजलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

2015 मध्ये डेटिंग सुरु झाल्यानंतर येत्या 15 एप्रिलच्या मुहूर्तावर रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

पाच वर्षांचं रिलेशनशीप, रिचा चढ्ढा-अली फजलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

मुंबई : पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 15 एप्रिलला रिचा आणि अली लग्न करणार असल्याची माहिती (Richa Chadha Ali Fazal to Get Married) आहे.

अली फजल आणि रिचा चढ्ढा यांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल कायमच मनमोकळेपणे बोलणं पसंत केलं आहे. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती. रिल लाईफ कपलने रिअल लाईफ कपल होण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये सुरुवात केली.

74 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीच्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला, तेव्हा अली आणि रिचा यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. 2015 मध्ये डेटिंग सुरु झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

आपल्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर अली आणि रिचा यांनी एप्रिलच्या मध्यावर लगीनगाठ बांधण्याचा विचार केला आहे. हा सोहळा दिल्लीत 15 एप्रिलच्या मुहूर्तावर होईल, असं बोललं जातं. कोर्ट मॅरेजनंतर जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत रिसेप्शन होईल, अशी माहिती ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिली आहे.

दिल्ली, लखनौ आणि मुंबईमध्ये तीन रिसेप्शन सोहळ्यांचं आयोजन करण्याचा अली-रिचाचा मानस आहे. रिचाचं कुटुंब दिल्लीत, तर अलीचं कुटुंब लखनौमध्ये राहतं. मुंबईतील सोहळ्याला बॉलिवूडमधील तारे-तारका उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. मुंबई रिसेप्शनसाठी 21 एप्रिलचा दिवस निश्चित झाला आहे.

33 वर्षीय रिचा चढ्ढाने 2008 मध्ये ‘ओये लकी! लकी ओये’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने गँग्ज ऑफ वासेपूर 1 आणि 2, फुक्रे यासारख्या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केल्या. मात्र ‘मसान’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. त्यानंतरही सरबजीत, आर्टिकल 375 यासारखे सिनेमे गाजले.

अली फजलने ‘थ्री इडियट्स’मध्ये साकारलेली छोटीशी भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. फुक्रे, हॅपी भाग जायेगी हे चित्रपट, तर मिर्झापूर या वेब सीरिजमुळे अली नावारुपास आला. (Richa Chadha Ali Fazal to Get Married)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *