रोहितच्या झंझावाताने अनेक विक्रम मोडले

रोहितने 128 चेंडूत 119 धावा ठोकून कारकिर्दीतील 29 व्या शतकाला गवसणी घातली. रोहितचं हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं 8 वं शतक ठरलं.

Rohit Sharma, रोहितच्या झंझावाताने अनेक विक्रम मोडले

बंगळुरु : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वन डे सामन्यात झंझावाती शतक ठोकलं. रोहितचं शतक, विराट कोहलीच्या 89 धावांच्या जोरावर भारताने तिसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. या विजयाने भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात टाकली.

हा सामना रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) खास ठरला. रोहितने अनेक विक्रम आपल्या नावे केले. रोहितने 128 चेंडूत 119 धावा ठोकून कारकिर्दीतील 29 व्या शतकाला गवसणी घातली. रोहितचं हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं 8 वं शतक ठरलं. सर्वाधिक शतकांच्या यादीत रोहित शर्मा आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे. जयसूर्याच्या नावावर वन डेमध्ये 28 शतकं आहेत.

9 हजार धावा

दरम्यान, रोहित शर्माने वन डेमधील 9 हजार धावांचाही टप्पा ओलांडला. कालच्या सामन्यातील 119 धावांमुळे रोहितच्या नावे आता वन डेमध्ये 9115 धावा जमा झाल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं

1. सचिन तेंडुलकर (भारत) – 49
2. विराट कोहली (भारत)- 43
3. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 30
4. रोहित शर्मा (भारत) – 29
5. सनथ जयसूर्या (श्रीलंका) – 28

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पहिला नंबर लागतो. सचिनने कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत 9 शतकं झळकावली आहेत. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा प्रत्येकी 8 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू

1. सचिन तेंडुलकर – ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतकं
2. विराट कोहली – वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतकं
3. सचिन तेंडुलकर – श्रीलंकाविरुद्ध 8 शतकं
4. विराट कोहली – श्रीलंकाविरुद्ध 8 शतकं
5. विराट कोहली – ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतकं
6. रोहित शर्मा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतकं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *