अतिआत्मविश्वास नडेल, संघाने टोचले भाजप नेत्यांचे कान, निवडणुकांसाठी भाजपला बळ

नागपुरात झालेल्या समन्वय बैठकीत संघ नेत्यांनी भाजपच्या ओव्हरकॉन्फिडंट नेत्यांचे चांगलेच कान टोचले आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा सल्ला दिला.

अतिआत्मविश्वास नडेल, संघाने टोचले भाजप नेत्यांचे कान, निवडणुकांसाठी भाजपला बळ

नागपूर : भाजप (BJP) म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) राजकीय शाखा. त्यामुळेच भाजपचे दिवस चांगले असो की वाईट, संघ नेहमीच भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. अशा स्थितीत संघाच्या मदतीशिवाय भाजपच्या स्वबळाला बळ येणार नाही. त्यामुळेच भाजपच्या संघ समन्वयाला गती आली आहे. नागपुरात (Nagpur) झालेल्या समन्वय बैठकीत संघ नेत्यांनी भाजपच्या ओव्हरकॉन्फिडंट नेत्यांचे चांगलेच कान टोचले. आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा सल्ला दिला.

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) भाजपने 288 मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. अशा स्थितीत भाजपच्या स्वबळाला संघाचं बळ आवश्यक आहे. त्यामुळेच भाजप आणि संघ परिवारातील सर्व संघटनांच्या समन्वयाला गती आली आहे. मुंबई, औरंगबाद आणि नागपूर… संघ परिवाराने विभागवार समन्वय बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. नागपुरात दोन दिवसीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत संघ परिवाराच्या 30 पेक्षा जास्त संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपच्या नेत्यांची समन्वयावर चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. आधी जनसंघ आणि त्यानंतर 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळेच भाजपच्या काही नेत्यांना अतिआत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे. अशा अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांचे संघाने चांगलेच कान टोचले. ‘विजयामुळे हुरळून जाऊ नका, कामाला लागा, शेवटच्या माणसापर्यंत पोहचा, असा सल्ला नागपुरात पार पडलेल्या समन्वय बैठकीत देण्यात आला.

सेना-भाजपमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, पण… : चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीत भाजप एकीकडे युतीची भाषा बोलत असलं, तर दुसरीकडे भाजपने 288 जागांवर तयारीला जोर दिला आहे, हे कधीही लपून राहिलं नाही. भाजप आणि शिवसेनेची व्होटबँक जवळपास एकच आहे. अशा स्थितीत भाजपच्या यशासाठी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतं टाकणारे मतदार, भाजपच्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळेच भाजपला संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटनांची मदत लागणार आहे. तेव्हाच भाजपच्या स्वबळ मोहिमेला बळ येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 30 पेक्षा जास्त संघटना समाजात काम करतात. विद्यार्थी, आदिवासी, महिला, ज्येष्ठ
नागरिक, शिक्षण, कृषी, विज्ञान, कला अशा विविध क्षेत्रात संघाचं मोठं काम आहे. याच कामाच्या निमित्ताने संघ स्वयंसेवक समाजाच्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. आता निवडणुकीत संघाच्या याच नेटवर्कचा फायदा व्हावा, यासाठी भाजपने संघाशी समन्वय करण्यास गती दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *