शरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि महाविकासआघाडीची कल्पना सुचली : संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने सूड उगवला, त्यांनी विरोधी पक्षनेता व्हावे लागले. महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची आहे, असेही संजय राऊत (Sanjay raut Nashik interview) म्हणाले.

शरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि महाविकासआघाडीची कल्पना सुचली : संजय राऊत

नाशिक : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनासाठी महाविकासआघाडीची कल्पना सुचली,” असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay raut Nashik interview) केले. “या सत्तेचे शिल्पकार शरद पवार असून आपण फक्त एक कार्यकर्ता आहोत,” असेही संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना नगरसेवक अजय बोरस्ते यांनी ऊर्जा युवा प्रतिष्ठातनतर्फे शनिवारी 25 जानेवारीला नाशिकमध्ये संजय राऊत यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती. प्रसिद्ध मुलाखतकार राजू परुळेकर यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी राऊतांनी हे वक्तव्य (Sanjay raut Nashik interview) केले.

“शरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनासाठी महाविकासआघाडीची कल्पना सुचली. या सत्तेचे शिल्पकार शरद असून आपण फक्त एक कार्यकर्ता आहोत. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात राज्यात छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त नाव घेतले जात होते. पडद्यामागे मात्र वेगळेच सुरु होते. सूडाचे राजकारण सुरु होते. सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्यागत भाजपचा कारभार सुरु होता.”

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, सत्ता ही चंचल आहे. ती आज आहे, उद्या नाही. सत्ता आली म्हणून मातू नका, गेली म्हणून रडू नका. ती टिकवण्यासाठी वेडेवाकडे उद्योग करु नका. अन् हे वेडेवाकडे उद्योग शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत गेले आणि तिथेच राज्यातील सत्तापरिवर्तनाची पहिली ठिणगी माझ्या डोक्यात पडली,” असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

“महाविकासआघाडीचा पॅटर्न हा देशातील परिवर्तनाची नांदी आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 खासदार याच विचाराने निवडून यायला हवेत. येत्या लोकसभा निवडणुकीत 2024 ला हे परिणाम दिसतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्रालय हे लोक कल्याणकारी कामांसाठी आहे. राज्य घडवण्यासाठी आहे. ते षडयंत्र, कारस्थान करण्याचं केंद्र होऊ शकत नाही. पक्षातल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा तो अड्डा होऊ नये. असे असेल तरी दुदैवाने मागील सत्ताकाळात तेच झाले. त्याच फळ म्हणून भाजपला सत्ता गमवावी लागली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर काळाने सूड उगवला, त्यांनी विरोधी पक्षनेता व्हावे लागले. महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची आहे, असेही संजय राऊत (Sanjay raut Nashik interview) म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *