BLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी – सामान्यीकरणाचा धोका

आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींना generalize करायची आणि वर्गीकृत करायची सवय असते. खरंतर हे सगळं आपोआप घडत असतं. हे होणं जगण्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्याने गोष्टी सोप्या होतात. आपण फक्त काळजी घेतली पाहिजे (Factfulness and Generalization Instinct).

BLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी - सामान्यीकरणाचा धोका
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 1:43 AM

मी 2015 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील “शोधग्राम” (“सर्च” / SEARCH) या प्रसिद्ध सामाजिक संस्थेला भेट देण्यासाठी पुण्याहून निघाले. युवकांसाठीचं एक शिबीर भरणार होतं आणि त्यासाठी मी निघाले होते. आठवड्याचा मुक्काम होता. आई-बाबांचा प्रचंड विरोध होता, की त्या नक्षलवादी भागात तरण्याताठ्या पोरीला एकटीने आम्ही जाऊ देणार नाही. तिकडे लोक बंदुका घेऊन फिरतात, अपहरण होतात, गाड्या उडवल्या जातात आणि काय काय. त्यांना समजावताना माझ्या नाकी नऊ आले; पण त्यांचं मन काही धजावतच नव्हतं! तरीही मी निघालेच (Factfulness and Generalization Instinct).

खरं तर, माझ्याही मनात जराशी धाकधूक होतीच! पुण्यावरून नागपूर रेल्वे प्रवास, नागपूरवरुन गडचिरोलीची बस पकडली. एकदाची गडचिरोलीला पोहचले, पण जशी मी गडचिरोलीच्या बस स्थानकातून पुढच्या बसमध्ये बसले, मला जास्तच भीती वाटू लागली. अनोळखी रस्त्यावरुन सरसर अंतर कापत बस पुढे निघाली. एकीकडे आपण सुरक्षित पोहचू ना हा प्रश्न सतावत असताना, खिडकीतून बाहेर एकदम सामान्य असे शेती-वाडी करणारे आदिवासी लोक दिसत राहिले.

छोट्या-छोट्या थांब्यांवर बस थांबत होती, लोक चढत-उतरत होते आणि मी उत्सुकतेने त्यांचे निरीक्षण करत होते. बाहेरचे वातावरण देखील इतर कुठल्याही ठिकाणी असते, तसेच अतिशय साधारण होते! कुठेही दंगबाजी, गोळीबार याचा लवलेश सुद्धा नव्हता. सर्चमध्ये पोहचता-पोहचता गडचिरोली भागाबद्दल माझ्या मनात असणाऱ्या सगळ्या वाईट प्रतिमांना आपोआप तडा जात राहिला. पहिल्यांदाच प्रवासाचे महत्व मला पटत गेले! 

एक प्रसंग नुकताच घडला. शनिवारी सुट्टीचा दिवस आणि कुठेतरी फिरुन यायचं म्हणून आम्ही “कार्ले लेण्या” बघायला गेलो. लेण्यांना चिकटून शेजारीच एकवीरा देवीचं मंदिर आहे. लेण्या पाहणाऱ्या लोकांपेक्षाही मंदिरात येणाऱ्या लोकांची गर्दी खूप होती. कोळी बांधवांचं आराध्य दैवत असणाऱ्या देवीला मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती आणि त्यातही कोळी लोक खूप होते. माझ्या डोळ्यात कोळी समाजाचे लोक कसे दिसतात याचे टीव्हीमुळे जे चित्र घट्ट रुतून बसले होते, ते मात्र बिलकुल दिसत नव्हते. माझा काही केल्या विश्वासच बसेना की इतके छान कपडे घातलेले, गोरेपान, सामान्य मराठी बोलणारे हे लोक कोळी आहेत!

1972 मध्ये स्वीडनमधून एक डॉक्टर भारतात पुढील शिक्षणासाठी आले होते. पहिल्याच दिवशी वर्गामध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे चित्र देऊन प्रश्न विचारण्यात आले. स्वीडनच्या डॉक्टरांना त्या प्रश्नांची उत्तरे माहित होती परंतु त्यांनी हात वर न करता वर्गाचे निरीक्षण करायचे ठरवले. मनोमन ते खूश होते. त्यांना वाटलं या वर्गात मी एकटाच असेन ज्याला सगळी उत्तरं येतील, भारतासारख्या अप्रगत देशात कुणाला इतकं ज्ञान असणार. पुढच्याच क्षणी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. वर्गातील जवळपास 60% युवकांचे हात वर होते. त्यातल्या बऱ्याच जणांनी कर्करोग कुठल्या अवयवाचा आहे, त्याचे निदान कसे करावे, उपचार काय करावेत याची माहिती दिली आणि हे ऐकून तो स्वीडिश डॉक्टर जागेवरुन उडालाच! त्याला संशय आला की तो चुकून वरिष्ठ वर्गात तर नाही नं येऊन बसला. खात्री करुन घेण्यासाठी त्याने बाजूला बसलेल्या एका डॉक्टरला विचारलं. त्यांना कळून चुकलं हे आपलेच वर्गमित्र आहेत.

स्वीडिश डॉक्टरांच्या लेखीही नव्हते, की भारतासारख्या अप्रगत देशात वैद्यकीय शास्त्रातील लोकांना एवढं ज्ञान असू शकेल. पाश्चिमात्य देशच सगळीकडे वरचढ आहेत, हा त्याचा पूर्वग्रह त्यादिवशी गळून पडला. तसेच सर्वच विकसनशील देश आरोग्य विभागात जेमतेमचं आहेत, हे generalization (सामान्यीकरण) चुकीचं आहे, हे ही त्यांना कळून चुकलें ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द प्रा. हांस रोस्लिंग होते. त्यांच्याच ‘Factfulness’ या पुस्तकावर आधारित लेखमालेतला हा सहावा लेख – “Generalization Instinct”.

आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींना generalize करायची आणि वर्गीकृत करायची सवय असते. खरंतर हे सगळं आपोआप घडत असतं. हे होणं जगण्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्याने गोष्टी सोप्या होतात. आपण फक्त काळजी घेतली पाहिजे, की आपण गोष्टींना चुकीच्या माहितीवर सरधोपटपणे सगळीकडेच लागू करत नाही ना! जसे की, एखादे अपवादात्मक उदाहरण आपण संपूर्ण गटालाच लागू करतो. माध्यमांना असे करायला फार आवडते. माध्यमे आपल्यासमोर एखाद्या समाजेचे, विभागाचे, देशाचे किंवा गटाचे चित्र उभे करताना कित्येकदा गोष्टींचं सामान्यीकरण (generalize) करुन सांगतात/दाखवतात. काही बातम्यांचा मथळा: ग्रामीण भाग, मध्यम वर्ग, सुपर मॉम, आफ्रिकन देश इत्यादी. मराठीत “घरोघरी मातीच्या चुली” अशी म्हण आहे; जिचा अर्थ परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे असा होतो. इथेच आपण चुकतो! सगळे ग्रामीण भाग सारखे नसतात, सगळे आफ्रिकन देश सारखे नाहीत.

सामान्यीकरणाचे अजून उदाहरण आपण पहिल्या दोन उताऱ्यात वाचले आहे. गडचिरोली म्हणजे नक्षली हल्ल्यांमुळे कायम धुमधुमत, धगधगत राहणारा विभाग असल्याचं आपल्यावर बिंबवलं जातं. तसेच, कोळी लोक म्हणजे काळे- कुळकुळीत, विशिष्ट प्रकारची वेशभूषा करणारे आणि त्यांची विशिष्ट भाषा बोलणारे लोक असं चित्र माध्यमांतून आपल्यासमोर उभं केलं जातं. हे एकप्रकारे सामान्यीकरणच आहे, परंतु हे वाईट चित्र उभं करणं आहे. यालाच “stereotyping” (विशिष्ट प्रतिमांत अडकवणे) असं म्हणतात. आपण लैंगिक, वांशिक, जातीवादी stereotypes बद्दल बऱ्याचदा ऐकतो, बोलतो. 

माझ्या एका मुस्लीम मैत्रिणीच्या आईला एक शेजारच्या काकी सहज बोलल्या, “तुमच्या लोकांना काही समजतं नाही का, कोरोना पसरवतात”. मुस्लिम समाजाचं नेहमीच सरसकटीकरण केलं जातं. भारतातल्या सर्वच मुसलमानांना एकचं समजलं जातं. म्हणजेच एखादा मुस्लिम व्यक्ती दहशतवादी असला म्हणजे पूर्ण भारतातले मुसलमान लोक ही तसेच आहेत असं समजलं जातं. खरंतर अशा नकारात्मक मानसिकता तयार करण्यामागे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कारणे आहेत. माध्यमांचा त्यात मोठा हात आहे. तर असे चुकीचे सामान्यीकरण बऱ्याच समस्यांना जन्मास घालतात, आपली वैचारिक कक्षा खुंटवतात. आपले stereotypes मोडण्यासाठी आपण प्रवास केला पाहिजे, डोळ्याने जग बघितलं पाहिजं, लोकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे.

आपण पहिल्या भागात (The gap instinct) जगाला दोन भागात वर्गीकृत केलं होतं – आपण (“us”) आणि ते (“them”). त्याच दोन भागांना एकाच गटांत बसवण्याचे काम सामान्यीकरण करते. असा हा विरोधाभास आहे. 

एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, जगभरातील आरोग्य क्षेत्रातल्या उच्चपदस्थ लोकांचे ज्ञान पूर्वग्रहदूषित आहे. जगभरात 1 वर्ष वयाच्या बालकांना रोगप्रतिबंधक लसीकरण होण्याचे प्रमाण किती आहे? यावर सर्वात प्रगत अशा देशांतील बहुसंख्य तज्ज्ञांचे उत्तर अगदी चिंताजनक होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगभर फक्त 20% बालकांनाच अशा लसी टोचल्या आहेत. लस कारखान्यातून हॉस्पिटलात पोहचेपर्यंत विशिष्ट तापमानात ठेवावी लागते. त्यासाठी शीतलक वापरावे लागतात. तसेच हॉस्पिटलमध्ये ही शीत तापमानातच त्यांची साठवणूक करावी लागते. ही व्यवस्था फक्त प्रगत देशातच असते, हा पूर्वग्रह बाळगून वरील उत्तर देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात, 88% बालकांचे लसीकरण झाले आहे. उत्तरादाखल दिलेल्या आकड्यांची आणि वास्तविक आकड्यांची इतकी प्रचंड तफावत आपल्या डोक्यातल्या अप्रगत देशांच्या चित्रामुळे झालेली आहे. असे असेल तर, गुंतवणुकीच्या संधी आपण गमावत आहोत कारण उदयोन्मुख देशांमध्ये अशाप्रकारचे शीतलक आणि पुरवठा व्यवस्था यात बऱ्याच संधी आहेत.

आपण अशी चुकीची प्रतिमा तयार करताना “ते” या श्रेणीतील लोकांबद्दल नकळतपणे विचार करत असतो. आपल्या मते बहुतांशी जनता याच वर्गात मोडते. आपल्या डोळ्यांसमोर अशावेळी काय चित्र उभे राहते? बातम्यांमधून पाहिलेले विशिष्ट वेदनादायक चित्र आठवत राहतं ना? त्याचमुळे या प्रगत देशातील लेवल 4 वर स्थित उच्चपदस्थ लोकांनी अशी उत्तरे दिली असावीत. याचमुळे आपण बहुतांश मानवजातीला stereotype करून टाकतो!

वेगवेगळ्या कंपन्या नवीन उत्पादन बाजारात आणण्याआधी उपभोक्ता / ग्राहक कोण आहे यावर संशोधन करत असतात. बऱ्याचदा, विशिष्ट वर्गाने आपले उत्पादन विकत घेण्याइतपत आर्थिक क्षमता नाहीय, असे गृहीत धरून फक्त उच्च उत्पन्न गटालाच डोळ्यासमोर ठेवून ते उत्पादन बाजारात आणले जाते. जर तुम्ही फक्त लेवल 4 वरील लोकांसाठी उत्पादन करत असाल तर ती खूप मोठी चूक ठरू शकते कारण आजघडीला सर्वात  जास्त ग्राहक लेवल 2 आणि 3 वरचे लोक आहेत. पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे, लेवल 1 वरून लेवल 2 आणि 3 वर सरकणे सतत चालू आहे. म्हणजेच ही संख्या कायम वाढत जाणार आहे. या ग्राहकांना तुम्ही दुर्लक्षित करत असाल तर प्रचंड आर्थिक तोटा होऊ शकतो. व्यावसायिक रणनीती आखताना भविष्यातल्या ग्राहकांना ओळखण्यासाठी जगाची तथ्यपूर्ण माहिती समोर असावी, तरच फायदा आहे.

सामान्यीकरण करणे चुकीचे नाही, ते थांबवावे असेही नाही पण ते चुकीचे असू नये याची दक्षता घ्यायला हवी.

आपली तथ्यप्रियता जपण्यासाठी: 

  1. गटातील फरक आणि गटा-गटातील समान धागे शोधा (Look for differences within and similarities across groups)

एका अभ्यासात असे दिसून आले, की जगभरातले लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात याचा संबंध त्यांच्या धर्माशी, संस्कृतीशी किंवा त्यांच्या देशाशी नसून, त्यांच्या उत्पन्नाशी आहे. वेगवेगळ्या देशातील लोकांचे निरीक्षण या अभ्यासात केले आहे. कुठल्याही देशातले सारख्या उत्पन्न गटातील लोकांची जीवनशैली मिळतीजुळती आहे. जसे की, सर्वच देशातील निम्न उत्पन्न गटातले लोक स्वयंपाकाला चूल वापरतात. त्यापेक्षा एक स्तर वरील उत्पन्न गटात लोक स्टोव्हचा वापर करतात. उच्च उत्पन्न गटातले लोक गॅस शेगडी वापरतात.

त्याचप्रमाणे एकाच देशांतील विविध उत्पन्न गटातील लोकांची जीवनशैली एकदम वेगळी असते. लेवल 1 ते लेवल 4 पर्यंत लोक काय जेवतात, कसे राहतात, कुठे राहतात, किती जागेत राहतात या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड तफावत आढळून येते. आफ्रिकन देश म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर टोकाचे दारिद्र्य तरळून जाते; परंतु वास्तव असे नाहीय. खालील चित्र पाहुन हे स्पष्ट होईल. आफ्रिका खंडातील सोमालिया, घाना आणि ट्युनिशिया या देशांची संपत्ती आणि आरोग्य या निर्देशाकांच्या आधारे तुलना केलेली आहे.

 

  1. “बहुमत” म्हणजे नक्की काय? (Beware of “The Majority”)

आपण इथे एक गोष्ट लक्षात घेऊया की “बहुमत” म्हणजे अर्ध्याहून जास्त! मग ते 51%असेल अथवा 99%; दोन्हीही संख्या बहुमत मानल्या जातात. जेव्हाही एखाद्या गटात बहुमत/बहुसंख्य अशी एखादी समान गोष्ट असेल, तेव्हा सरसकटपणे सगळ्यांनाच ती गोष्ट लागू न करता; आपली गफलत होऊ नये म्हणून टक्केवारी पहावी.

उदाहरणार्थ: सर्वच देशातल्या बहुसंख्य महिलांची गर्भनिरोधक वापरण्याची गरज भागते. याचा अर्थ, सगळ्याच महिलांची ही गरज भागते असा होतो का? देशोदेशीचे आकडे समोर आले की वास्तव स्पष्ट होते. चीन आणि फ्रान्स येथील हे प्रमाण 96 टक्के आहे. तर दक्षिण कोरिया, ब्रिटन, थायलंड, इराण आणि तुर्की येथे  94 टक्के आहे. परंतु हेच प्रमाण हैती आणि लिबेरिया इथे 69 टक्के तर अंगोला इथे 63 टक्के आहे. म्हणजेचं प्रत्येक देशानुसात बहुसंख्येची टक्केवारी वेगवेळी आहे. यावरुन, कुठल्या देशत अजून काम करायची गरज आहे हे स्पष्ट होतंय.

  1. अपवादात्मक उदाहरणांना ओळख (Beware of exceptional examples)

अपवाद आपल्याला खुपच चांगले लक्षात राहतात. कित्येकदा एखाद्या उदाहरणावरुन त्या विशिष्ट गटाबद्दल आपण निष्कर्ष काढतो. उदाहरणार्थ: काही विशिष्ट रसायनांच्या गुणधर्मांमुळे “सर्व रसायने माणसांसाठी हानिकारक आहेत” असा निष्कर्ष काढला, तर तो साफ चुकीचा ठरेल. वास्तविकतः काही रसायने खरोखरीच हानिकारक असतात परंतु आपण हे विसरू नये की बहुतांश रसायने आपलं आयुष्य सुखकरच करतात. साबण, कपडे धुण्याचा सोडा, डेटोल, औषधे इत्यादी. तसेच, आपल्या शरीरातही रासायनिक क्रिया चालूच असतात. जर कुणी एखाद्या उदाहरणावरून पूर्ण गटाबद्दल निष्कर्ष काढण्यास सांगितले, तर त्यांना अजून काही उदाहरणे द्यायला सांगा किंवा दिलेल्या उदाहरणाच्या एकदम विरुद्ध उदाहरण ही त्या गटात आहे का हे पहा. जसे की, एखादे रसायन हानिकारक आहे असे सांगितले तर एखादे सुरक्षित/उपयुक्त रसायन आहे का हे पहा. सरधोपटपणे, शितावरून भाताची परीक्षा हा सिद्धांत इथे लागू होत नाही.

4.लोक मूर्ख नाहीत हे लक्षात घ्या (Assume people are not idiots)

तुम्ही दुसऱ्या देशात/विभागात/राज्यात आहात आणि तुम्हाला तुमच्या भागापेक्षा काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं तर तिथल्या लोकांना मुर्खात काढू नका. त्यामागचे तार्किक कारण समजून घ्या. तुम्ही लेवल 4 वर जगत असाल तर तुम्हाला लेवल 2 वर नेहमी सारखा अनुभव येणं केवळ अशक्य आहे. उदाहरणार्थ: ट्युनिशिया देशात लेवल 2 आणि 3 मधील लोकांची घरं अर्धवट बांधलेली आढळतील. त्यावरून, कुणीही या देशाला आळशी आणि इथल्या लोकांना मुर्ख म्हणू नये. हे लोक मुद्दामच वरच्या मजल्यावर बांधकाम काढत नाहीत. एका दमात मोठं घर बांधण्याएवढी ऐपत नसते आणि मध्यम उत्पन्न गटात मोडत असल्यामुळे गृहकर्ज मिळायला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. म्हणून हे लोक 15-20 वर्षाच्या कालावधीत जसजसे पैसे येत राहतील तसतसे विटा जमा करत राहतात. या विटा ठेवायला गच्चीचा वापर होतो आणि हळूहळू घर वाढवत राहतात.

(टीप – लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

संबंधित ब्लॉग:

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?

BLOG: तथ्यप्रियता – भाग 4 : भित्यापाठी ब्रम्हराक्षस

BLOG: तथ्यप्रियता – भाग 5 : राईच्या पर्वताचे रहस्य

Factfulness and Generalization Instinct

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.