51 हजार साप पकडले, घरात शिरलेला कोब्रा पकडताना सर्पमित्र महिलेला चावा

राज्यातील एकमेव महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांना कोब्रा या विषारी नागाने दंश केला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी,  बुलडाणा
  • Published On - 10:44 AM, 19 Jul 2019

बुलडाणा : राज्यातील एकमेव महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांना कोब्रा या विषारी नागाने दंश केला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे वनिता बोराडे यांनी आतापर्यंत 51 हजार साप पकडल्याचा दावा केला आहे.

सर्पमित्र असलेल्या वनिता बोराडे अनेक वर्षापासून साप पकडतात. मात्र एका घरातील साप पकडताना त्यांना  विषारी नागाने दंश केला. बुलडाणा जिल्ह्याच्या मेहेकर तालुक्यातील दूधा ब्रम्हपुरी या गावात काल सकाळच्या सुमारास एका व्यक्तीच्या घरात साप असल्याची माहिती मिळाली होती. तो साप पकडण्यासाठी वनिता बोराडे गेल्या होत्या. त्या विषारी नागाने उंदीर  गिळला होता. त्या नागाला मोठ्या शिताफीने पकडण्यासाठी हात पुढे केला असता, त्याने बोराडे यांच्या हाताला दंश केला. त्यानंतरही वनिता बोराडे यांनी त्या नागाला पकडून जंगलात सोडून दिले.

त्यानंतर वनिता बोराडे यांना तात्काळ मेहेकर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक प्रेमचंद पंडित यानी सांगितले. शिवाय सर्पदंश झालेल्या रुग्णांना सरकारी दवाखाण्यातच आणावे आणि उपचार घ्यावे असंही डॉक्टर म्हणाले.

कोल्हापुरात उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू

एकीकडे बुलडाण्याचे शल्य चिकीत्सक सर्पदंशानंतर सरकारी रुग्णालयातच उपचार घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र कोल्हापूरच्या प्रसिद्ध सीपीआर रुग्णालयात याच्या उलट चित्र आहे. काही दिवसापूर्वीच सर्पदंश झालेल्या तरुणाला सीपीआरमध्ये उपचार नाकारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. याप्रकरणी सीपीआरवर मोर्चाही काढण्यात आला, आता सीपीआर प्रशासनावर कारवाई होते का हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या 

सर्पदंश झालेल्या पोराचं विष स्वत:च्या तोंडाने ओढलं, तरीही बापाची शर्थ हरली, मुलाचा मृत्यू!