कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट; ‘वर्क फ्रॉम होम’ करताना वजन वाढीवर कसे नियंत्रण ठेवाल?, जाणून घ्या…

याचा परिणाम पुन्हा वजनवाढीवर होऊ शकतो. म्हणून वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. second wave of the corona

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:16 PM, 7 Apr 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट; ‘वर्क फ्रॉम होम’ करताना वजन वाढीवर कसे नियंत्रण ठेवाल?, जाणून घ्या...
work from home

मुंबई: कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालावधीत अनेक जण घरातच आहेत. ऑफिसेस बंद असल्याने अजूनही वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. घराबाहेर न पडल्यामुळे आणि तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्याने बहुतेक लोकांना वजनवाढीच्या समस्येचा सामना करावा लागतोय. असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. यामुळे पुन्हा लोकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय. याचा परिणाम पुन्हा वजनवाढीवर होऊ शकतो. म्हणून वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. (The second wave of the corona; Learn how to control weight gain while working from home)

मुंबईतील सैफी आणि अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील लेप्रोस्कोपिक आणि बॅरिअट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या की, ‘‘कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला वर्क फ्रॉम होम ही नवीन संस्कृती स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण होते. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही बऱ्याच समस्यांमधून जावे लागले. परंतु लॉकडाऊनच्या दीर्घ काळावधीनंतर हळूहळू सगळ्यांनाच याची सवय झालीय. वर्क फ्रॉम होममुळे काम करणं सोपं झालं असलं तरी यामुळे अनेक दृष्परिणामांनाही सामोरे जाव लागत आहे.’’

‘‘अनियमित वेळापत्रक, वाढीव ताण, त्रास, झोपेच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहाराचे सेवन न करणे ही वजन वाढीची मुख्य कारणे आहेत. घरी राहून शारीरिक हालचाल मंदावल्याने वजन वाढतेय. या वाढत्या वजनामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उदभवू लागल्या आहेत. जसे की, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप एपनिया, कोलेस्टेरॉल संबंधी समस्या इत्यादीसारख्या लठ्ठपणाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत’’, असेही डॉ. अपर्णा म्हणाल्या.

आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करावे?

पौष्टिक खाद्यपदार्थ खावेत:

निरोगी आरोग्यासाठी घरात तयार केलेले अन्न खावेत. तळलेले अन्न, जंकफुड, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावेत. बाहेर अन्न मागवून खाणे शक्यतो टाळा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी घरात काय बनवायचे हे कुटुंबीयांसह चर्चा करून ठरवा. याशिवाय सोशल मिडीया, यू ट्युबवर विविध पौष्टिक खाद्यपदार्थांची पाककृती पाहून ते बनवण्याचा प्रयत्न करा.

आपले जेवण स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा:

स्वतः घरच्या घरी अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा तसेच अन्न आवश्यक पोषक घटकांचा समावेश करण्यावर भर द्या. स्वयंपाकगृह स्वच्छ ठेवा. दररोज जेवणात कोशिंबीर आणि सूप समाविष्ट करा. भूक लागल्यास ताजी फळे किंवा बियाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. रोजच्या जेवणातून आपण किती कॅलरी घेतो, याबद्दल लिहून ठेवण्यासाठी एक फूड डायरी तयार करा. मोठ्या आकाराचे ताट भरून खाणे शक्यतो टाळा. ताटात अन्न भरलेले दिसावेत, यासाठी लहान आकाराच्या ताटाचा वापर करा. जेणेकरून तुम्हाला ताट भरलेले दिसल्यास मानसिक समाधान मिळेल.

खाण्याचे वेळापत्रक ठरवा:

दिवसभरात किती वेळा खावे, याबाबत एक वेळापत्रक तयार करा. पौष्टिक खाद्यपदार्थ सेवनावर अधिक भर द्या. जंकफूड टाळा यामुळे अनावश्यक कॅलरी शरीराला मिळतात, जे वजन वाढीला कारणीभूत ठरतात. दिवसभर चिप्स किंवा पेस्ट्री खाऊ नका.
वजनावर लक्ष द्या: नियमितपणे आपले वजन आणि आपल्या बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) तपासणी करा. जर आपले वजन जास्त वाढल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मनापासून खाण्याचा सराव करा:

आपण काय खात आहात याकडे लक्ष द्या. अन्नाची चव घेऊन मन प्रसन्न ठेवून जेवा.

स्वत: ला हायड्रेट करा:

आरोग्यासाठी पाण्याचे सेवन अतिशय फायदेशीर आहे. म्हणून भरपूर पाणी प्या. साखरयुक्त पेय, कार्बोनेटेड पेये आणि फळांचा रस टाळा. कारण फळांच्या रसात जास्त प्रमाणात साखर मिसळून दिलेली असते. अल्कोहोल आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळावेत, हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

दररोज व्यायाम करा:

घर बसल्या काम करण्याचा अर्थ असा नाही की, आपण तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे टाळावेत. आपण घरी नृत्य करू शकता, एरोबिक्स करू शकता, दोरीचे व्यायाम करू शकता. कामातून काही वेळ काढून उभे राहून काही वर्कआऊट्स करू शकता. निरोगी जीवनशैलीची अवलंब करा. कामाव्यक्तिरिक्त आरोग्याकडेही पुरेसे लक्ष द्या. कामाचा ताण घालवण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवा. ध्यान किंवा योगाभ्यास करा.

पुरेशी झोप घ्या:

झोप ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी कामातून वेळ काढून काही तास पुरेशी झोप घ्या. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती मिळते. झोप न घेणं हे वजन वाढीचे आणखीन एक कारण आहे.

संबंधित बातम्या

Pune Lockdown : ‘व्यापाऱ्यांचा संयम संपला, कधीही दुकाने उघडतील’, पुण्यातील व्यापारी संघटनांचा इशारा

aharashtra Lockdown : व्यापाऱ्यांना आठवड्यातील 3 दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

The second wave of the corona; Learn how to control weight gain while working from home