जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सोप्या टिप्स

जगभरात ई कॉमर्समध्ये आपले वर्चस्व निर्माण केलेल्या अॅमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेजॉस यांनी व्यवसायात यशस्वी होण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सोप्या टिप्स

लास व्हेगस (अमेरिका) : व्यवसाय किंवा व्यापार करणे कसे महत्त्वाचे आहे हे कोणीही सांगितले तरी ते करणे काही तेवढे सोपे नसते. ते नक्कीच आव्हानात्मक असते. मात्र, जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने तुम्हाला व्यवसाय करण्याच्या टिप्स दिल्या, तर याचा नक्कीच फायदा होईल. जगभरात ई कॉमर्समध्ये आपले वर्चस्व निर्माण केलेल्या अॅमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेजॉस यांनी अशाच महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी नवउद्योजकांना नेहमी ग्राहकांचा विचार करण्याचा आणि काही चुका झाल्या तरी त्याची फार काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी अॅमेझॉन री:मार्सच्या कॉन्फरन्समध्ये याविषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोणताही व्यक्ती एक स्मार्ट उद्योजक कसा होऊ शकतो याच्या टिप्स दिल्या. बेजॉस म्हणाले, “आपण सुरु केलेला व्यवसाय हा एक प्रयोग असतो. त्यात अपयश पण येऊ शकतं. कोणत्याही अपयशासाठी तयार राहायला हवे. तसेच पुढे जाण्यासाठी कठोर निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही ग्राहकांप्रती अधिक उत्साही आणि प्रामाणिक असायला हवे. हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या ग्राहकांना कसे आनंदी करणार याचा नेहमी विचार करत राहायला हवे.”

अॅमेझॉनने आपल्या स्थापनेपासून अशाचप्रकारे प्रवास केला. त्यांनी या प्रवासात ग्राहकांना सर्वात स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. या काळात त्यांना मोठ्या नुकसानीलाही तोंड द्यावे लागले. मात्र, यानंतरही आज अॅमेझॉन सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली. अॅमेझॉन जगभरात ट्रिलियन डॉलरचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरली आहे.

बेसबॉलचे उदाहरण देत चर्चा
बेजॉस यांनी उपस्थितांना बेसबॉलचे उदाहरण देत व्यवसायातील टिप्स दिल्या. ते म्हणाले, “बेसबॉलमध्ये ‘होम रन’साठी खेळाडू बॅटला खूप स्विंग करतो. त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. बेसबॉलमध्ये मेहनत घेतल्यास तुम्हाला अधिकच्या 4 धावा मिळतील. मात्र, व्यवसायात यश मिळाले तर तुम्हाला 1000 धावा मिळतील.”

बेजॉस यांनी स्वतःवर विश्वास असेल तेव्हाच व्यवसाय सुरु करण्याचाही सल्ला दिला आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *