AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crypto Market : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने नवा भूकंप, एका झटक्यात लोकांची उडाली झोप!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. आता ट्रम्प यांच्या या निर्णयाने शेअर मार्केट तसेच क्रिप्टो मार्केटमध्ये भूकंप आला आहे. लोकांचे अब्जो डॉलर्स बुडाले आहेत.

Crypto Market : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने नवा भूकंप, एका झटक्यात लोकांची उडाली झोप!
donald trump and crypto market
| Updated on: Oct 11, 2025 | 7:37 PM
Share

Donald Trump Crypto Market Collapsed : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच नवनवे आणि जगाला थक्क करणारे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर त्यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली. आता तर ट्रम्प यांनी आपला मोर्चा थेट चीनकडे वळवला आहे. त्यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयामुळे आता शेअर बाजार आणि क्रिक्टो करन्सीच्या जगतात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांची अब्जो डॉलर्स बुडाले आहेत.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने आता क्रिप्टो मार्केट तसेच शेअर मार्केटमध्ये लोकांचे लाखो कोटी डॉलर्स बुडाले आहेत. क्रिप्टो मार्केटमधील इथेरियन, डॉज कॉईन यासारख्या क्रिप्टो चलनाचे मूल्य चांगलेच घसरले आहे. बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. क्रिप्टो मार्केटप्रमाणेच शेअर मार्केटमधील ए-व्हिडिया, टेस्ला आणि अमेझॉन यासारख्या कंपन्यांच्या शेअरवरही दबाव वाढला आहे.

झटक्यात 19 अब्ज डॉलर्स बुडाले

ब्लुमर्गने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्या चीनवरील टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे 16 लाखांपेक्षा अधिक क्रिप्टो गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. झटक्यात 19 अब्ज डॉलर्स बुडाले आहेत. अवघ्या एका तासात हा सगळा खेळखंडोबा झाला आहे. डिजिटल संपत्तीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पडझड आहे. आज क्रिप्टो मार्केटचे मूल्य 560 अब्ज डॉलर्स घसरले आहे.

क्रिप्टो आणि शेअर मार्केटमध्ये भूकंप

शेअर बाजारातही सध्या तशीच स्थिती आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे तब्बल 1.75 ट्रिलियन डॉलर्स बुडाले आहेत. म्हणजे क्रिप्टो आणि शेअर मार्केट अशा दोन्ही मंचावर ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भूकंप आला आहे. या दोन्ही मंचावर 2 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच साधारण 177.44 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

बिटकॉईनचे मूल्य किती घटले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेतल्यानंतर 11 ऑक्टोबरच्या दुपारी 12.42 वाजता बिटकॉईनचे मूल्य 8 टक्क्यांपेक्षा अधिक घसरून थेट 1,11,542.91 डॉलर्सपर्यंत कमी झाले. इथेरियमचीही अशीच स्थिती राहिली. इथेरियममध्ये 12.7 टक्क्यांनी घट होऊन त्याचे मूल्य 3,778.31 डॉलर्सपर्यंत घसरले. दरम्यान, आता ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम पुढच्या किती दिवस राहणार? आणि शेअर तसेच क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा तेजी कधी दिसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.