Trump vs Harris debate : ‘महिलांनी त्यांच्या शरीरासोबत काय करायचं हे…’ हॅरिस यांनी ट्रम्पना सर्वांसमोर सुनावलं
US presidential debate : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून तर हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यापासून रोखण्यासाठी कमला हॅरिस रिंगणात आहेत. त्यांच्यामध्ये एका मुद्यावरुन जोरदार डिबेट झाली.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होण्याआधी प्रेसिडेंशियल डिबेट होते. या डिबेटमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार आपआपले मुद्दे मांडतात. काल रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यात गर्भपाताच्या मुद्यावरुन जोरदार डिबेट झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भपाताच्या धोरणाचा बचाव केला. अबॉर्शनवर 6 आठवड्यांच्या बॅनला सपोर्ट केला. अबॉर्शनवर डेमोक्रॅटसची तीच जुनी धोरणं आहेत, असं ट्रम्प म्हणाले. “अबॉर्शन हा सर्वस्वी महिलांचा अधिकार आहे, तो त्यांचा निर्णय आहे. महिलांनी त्यांच्या शरीरासोबत काय करायचं हे ट्रम्प तुम्ही त्यांना सांगू नका” असं कमला हॅरिस म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर ते संपूर्ण देशात गर्भपात रोखणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करतील असं कमला हॅरिस म्हणाल्या.
ट्रम्प यांनी लगेच कमला हॅरिस यांचा आरोप खोडून काढला. कमला खोटं बोलतेय. “मी अशा कुठल्याही बंदी विधेयकावर स्वाक्षरी करणार नाहीय. असं करण्याची आवश्यकता नाहीय” गर्भपातासंबंधी राष्ट्रीय स्तरावर बॅन घालण्याच्या विधेयकावर वीटो वापरणार का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “मला असं करण्याची आवश्यकता नाहीय. कारण अशा कुठल्याही विधेयकाला काँग्रेसची मंजुरी मिळणार नाही”
ट्रम्प यांनी हाताच्या मुठ्ठी आवळल्या
एबीसी न्यूजने हा डिबेट शो आयोजित केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी हाताच्या मुठ्ठी आवळून आपल्या समर्थकांना अभिवादन केलं. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. याआधी 2016 साली त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर डेमोक्रॅट उमेदवार ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केलं. आता ट्रम्प पुन्हा एकदा आपलं नशीब आजमवत आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचं आव्हान होतं. पण प्रकृतीच्या कारणास्तवर बायडेन यांनी माघार घेतली. त्यांच्याजागी कमला हॅरिसला संधी मिळाली.