अमेरिकेचं सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्याने डोनाल्ड ट्रम्प ईराणवर संतापले

जहाजांच्या मार्गासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या हॉर्मूज (Strait of Hormuz) जवळ ईराणने अमेरिकेचं हेरगिरी करणारं ड्रोन पाडलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय.

अमेरिकेचं सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्याने डोनाल्ड ट्रम्प ईराणवर संतापले

वॉशिंग्टन : आपलं शक्तीशाली ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेने ईराणला आता सज्जड दम दिलाय. तेहरानने (ईराण) मोठी चूक केली आहे, असं ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. जहाजांच्या मार्गासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या हॉर्मूज (Strait of Hormuz) जवळ ईराणने अमेरिकेचं हेरगिरी करणारं ड्रोन पाडलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय. तर आमचं सैन्य युद्धासाठी तयार असल्याचंही ईराणच्या लष्करप्रमुखांनी सांगितलंय.

ईराणने एक मोठी चूक केली आहे, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं. अमेरिका ड्रोन पाडल्याच्या रागातून ईराणवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. ईराणवरील आर्थिक बंधनं आणि त्यानंतर टँकरवर हल्ल्यानंतर आखाती क्षेत्रात तणाव वाढला आहे. त्यातच ईराणच्या कारवाईमुळे अमेरिकाही नाराज झाली आहे. आम्ही अमेरिकेचं ड्रोन पाडलं असल्याचं ईराणच्या सैन्यानेच सांगितलं होतं. तर ही घटना आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत घडल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं होतं.

सर्वात शक्तीशाली ड्रोन वापरणाऱ्या अमेरिकेचं ड्रोन पाडून ईराणने अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का दिलाय. MQ-4C ट्रायटन हे अमेरिकेचं सर्वात अत्याधुनिक ड्रोन मानलं जातं. 2032 पर्यंत हे 68 ड्रोन सैन्याच्या ताफ्यात आणण्याचं उद्दीष्ट अमेरिकेने ठेवलंय. MQ-4C ड्रोन 30 तासांपेक्षा जास्त वेळ 56 हजार फूट उंचीवर उडण्यास सक्षम आहे. या ड्रोनमधील सेन्सरमुळे फुल मोशन व्हिडीओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो, ज्यामुळे अचूक निशाणाही साधता येतो. यामध्ये रॉल्स रॉयसचं इंजिन आहे. या ड्रोनची लांबी 50 फूट असून पंखांची लांबी 130 फूट आहे. 368 मैल प्रति तास या वेगाने धावण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.

अमेरिकेचं ड्रोन पाडण्यामागे रशियाचंही कनेक्शन असल्याचं बोललं जातंय. MQ-4C ड्रोनला एखाद्या सामान्य मिसाईलने पाडलं जाऊ शकत नाही. यासाठी दमदार रडार गाईडेड मिसाईल लागतात. विशेष म्हणजे ईराणकडे रशियाची S-300 सिस्टम आहे, जी या ड्रोनला पाडण्यास सक्षम आहे. यामुळेच अमेरिकेचा संताप अनावर झालाय. अमेरिकेचं टायटन ड्रोन पहिल्यांदाच एखाद्या देशाने पाडल्याचं बोललं जातंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *