अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा, महिला खासदारांना ट्रम्प यांचा सल्ला

अमेरिका एक स्वतंत्र, सुंदर आणि यशस्वी देश आहे. तुम्ही आमचा द्वेष करत असाल, इथे खुश नसाल तर इथून जाऊ शकता, असा सल्ला त्यांनी या चार महिला खासदारांना दिला.

अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा, महिला खासदारांना ट्रम्प यांचा सल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. डेमोक्रेकिट पक्षाच्या चार महिला खासदारांना त्यांनी ट्वीट करत सूचक इशारा दिलाय. अमेरिका आवडत नसेल, तर तुमच्या उजाडलेल्या देशात निघून जा, असं ट्वीट त्यांनी केलं. अमेरिका एक स्वतंत्र, सुंदर आणि यशस्वी देश आहे. तुम्ही आमचा द्वेष करत असाल, इथे खुश नसाल तर इथून जाऊ शकता, असा सल्ला त्यांनी या चार महिला खासदारांना दिला.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ट्रम्प याची वागणूक वर्णभेदी आणि घृणास्पद असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पक्षाकडून करण्यात आलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलेक्झेंड्रिया ओकासियो कॉर्टेज, इल्हान ओमर, राशिदा तलाईब आणि अयाना प्रेस्ली यांच्यावर निशाणा साधलाय. या महिला खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकतीच जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना ट्रम्प यांनी या खासदारांना देश सोडून जाण्याचा सल्ला दिला.

महिला खासदारांवर बोलताना ट्रम्प यांनी ट्वीट केलं की, हे पाहून आश्चर्य वाटतं, प्रगतीशिल डेमोक्रेट महिला काँग्रेस, ज्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या देशातून आल्या आहेत. त्या आम्हाला सरकार कसं चालवायचं ते शिकवत आहेत. त्यांनी आपापल्या देशात जाऊन तिथल्या समस्या सोडवाव्यात, असं ट्रम्प म्हणाले.

न्यूयॉर्कच्या 29 वर्षीय महिला काँग्रेस अलेक्झेंड्रिया ओकासियो कॉर्टेज यांचा जन्म अमेरिकेतच झाला आहे. अमेरिकेतील मिन्नेसॉटच्या 37 वर्षीय महिला काँग्रेस इल्हान ओमर यांचा जन्म सोमालियामध्ये झाला आहे. वयाच्या 10 व्या वर्षी त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. मिशिगनच्या महिला काँग्रेस राशिदा तलाईब यांचा जन्म अमेरिकेतील डेट्रॉईटमध्येच झाला आहे. तर अयाना प्रेस्ली यांचाही जन्म अमेरिकेतच झालाय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याविरोधात अनेकदा जाहीरपणे निषेध नोंदवण्यात आलाय. गेल्या वर्षीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आफ्रिकन देशांची तुलना गटारीशी केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *