जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा वारसदार भारतीय!

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 21:05 PM, 6 May 2019

दिल्ली : जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि 60 पेक्षा अधिक कंपनींचे मालक असलेले वॉरेन बफेट हे गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या पुढील वारसदाराचा शोध घेत होते. त्यानुसार बफेट यांनी स्वत: च्या कंपनीतील दोन व्यक्तींना आपलं वारसदार म्हणून घोषित केलं आहे. यातील एक व्यक्ती ही भारतीय वंशाची असून अजीत जैन असं या व्यक्तींचे नाव आहे.

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या दोघानंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून वॉरेन बफेट यांची ओळख आहे. बफेट यांच्याकडे 90 अरब डॉलर म्हणजेच 6.226 लाख कोटी रुपयाची संपत्ती आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बफेट हे व्यवसायासाठी योग्य वारसदाराचा शोध घेत होते. त्यानुसार त्यांनी आपल्या व्यवसायाची जबाबदारी भारतीय वंशाचे अजीत जैन आणि ग्रेगरी एबल यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

“ग्रेगरी आणि अजीत हे दोघेही माझ्या विश्वासातील आणि सर्वात जवळचे आहेत. त्यामुळे ते भविष्यातही माझ्यासोबत राहू शकतात”, असा विश्वास  वॉरेन बफेट यांनी व्यक्त केला.

अजीत जैन आणि ग्रेगरी एबलच्या कामगिरीमुळे कंपनीला अनेकदा फायदा झाला आहे. आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्यांना गेल्यावर्षीच प्रमोशन देत बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या टीममध्ये समावेश केला होता.

कोण आहेत अजीत जैन?

अजित जैन (68) यांचा जन्म भारतातील सर्वात गरीब राज्य ओडिशामध्ये झाला आहे. आयआयटी खडगपूरमधून 1972 मध्ये त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरिंगची पदवी पूर्ण केली. अजित जैन यांनी हॉर्वड बिझनेस स्कूलमधून 1978 मध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.  काही काळ त्यांनी आयबीएस कंपनीमध्ये सेल्स टीममध्ये नोकरी केली.  त्यानंतर जैन यांनी कन्सल्टेन्सी फर्म McKinsey and Co.मध्ये नोकरी केली. ही नोकरी सोडल्यानंतर त्यांनी 1986 मध्ये बर्कशायर हाथवे या इन्शुअरन्स कंपनीत रुजू झाले.

2014 मध्ये बफेट यांनी अजीत यांचे कौतुक करताना, अजीतचे डोकं म्हणजे आयडिया फॅक्टरी असे म्हटलं होत. सध्या अजित बर्कशायर हाथवे कंपनीतील अध्यक्ष पदावर काम करत आहेत.