चंद्रापासून अवघ्या 10 किमी अंतरावर यान कोसळलं, इस्रायलचं स्वप्न भंगलं

चंद्रापासून अवघ्या 10 किमी अंतरावर यान कोसळलं, इस्रायलचं स्वप्न भंगलं

जेरुसलेम : इस्त्रायलचं  चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. इस्रायलचं अंतराळयान चंद्रावर उतरण्याच्या अवघ्या काही सेकंदापूर्वीच  कोसळलं. तांत्रिक बिघाड झाल्याने इस्त्रायलचं चंद्रयान कोसळ्याचं सांगण्यात येत आहे.  इस्त्रायलच्या स्पेस आय एल (SpaceIL) या खासगी कंपनीचं बेरेशीट नावाचं अंतराळयान 21 फेब्रुवारीला चंद्रावर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर 4 एप्रिलला या चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश घेतला. मात्र, चंद्रावर उतरण्यासाठी अवघे 10 किलोमीटरचं अंतर शिल्लक असताना, या अंतराळयानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला आणि पुढील काही सेंकदातच इस्त्रायलचे हे अंतराळयान कोसळलं. या मोहिमेत अपयश आल्याने इस्रायलच्या वैज्ञानिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या मिशनचे प्रमुख अधिकारी डोरोन यांनी गुरुवारी या दुर्घटनेची माहिती दिली. डोरोन म्हणाले, “मला हे मिशन चंद्रयान यशस्वी न झाल्याचे प्रचंड दु:ख आहे. पण इतर देशांप्रमाणे आम्हीही चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करु शकतो याबाबत आम्हाला खात्री आहे”.

दरम्यान चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांमध्ये इस्त्रायल या देशाचा 7 वा क्रमांक आहे. पण आम्ही जर हा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला असता, तर आम्ही चौथ्या क्रमांकावर असतो असा विश्वासही डोरोन  यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत चंद्रावर जाणाऱ्या देशांमध्ये रशिया, अमेरिका आणि चीनचा समावेश आहे. इस्त्रायलने चंद्रयान मोहीम पूर्ण केली असती, तर या तिन्ही देशानंतर इस्रायलचा क्रमांक लागला असता. इस्त्रायलच्या या मोहिमेसाठी तब्बल दहा कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 690 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

हे मिशन अयशस्वी झाल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या मोहिमेबाबत प्रतिक्रिया दिली. “गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने या मिशनच्या कंट्रोल रुमवर लक्ष ठेवून होतो. हे मिशन अयशस्वी झाल्यामुळे वैज्ञानिक नाराज झाले आहेत” असं नेतन्याहू म्हणाले. तसेच वैज्ञानिकांनो तुम्ही चिंता करु नका, हा आपला पहिला प्रयत्न होता. यावेळी आपण अयशस्वी ठरलो, पण येत्या दोन वर्षात आपण  पुन्हा एकदा चंद्रावर यान पाठवू आणि त्यावेळी ते यशस्वी होईलच असं सांगत त्यांनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *