भाजप आमदाराने आमचं गाणं चोरलं, पाकिस्तानी सैन्याचा दावा

भाजप आमदाराने आमचं गाणं चोरलं, पाकिस्तानी सैन्याचा दावा

इस्लामाबाद : भाजप आमदार ठाकूर राजा सिंग लोध यांनी आमचं गाणं चोरलं, असा आरोप पाकिस्तानच्या सैन्याने केला आहे. आमदाराने पाक सैन्याच्या एका गाण्याची कॉपी करत त्यात थोडा बदल करुन ते भारतीय सैन्याला समर्पित केलं, असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला. ठाकूर राजा सिंग लोध हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारंसघातील भाजपचे आमदार आहेत.


आमदार ठाकुर राजा सिंग लोध यांनी शुक्रवारी 12 एप्रिलला त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओसोबत ठाकुर राजा सिंग लोध यांनी ट्वीट केलं, “श्रीराम नवमीच्या निमित्ताने 14 एप्रिलला दुपारी 11.45 वाजता माझं नवीन गाणं प्रदर्शित केलं जाईल. हे गाणं आपल्या भारतीय सैन्याला समर्पित आहे.”

भाजप आमदाराने आमचं गाणं चोरलं : पाकिस्तान 

ठाकूर राजा सिंग लोध यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या गाण्याचा काही भाग दाखवण्यात आला. यावर पाकिस्तानी सैन्याने हे गाणं त्यांचं असल्याचा दावा केला आहे.

“पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने 23 मार्चला हे गाणं प्रसारित करण्यात आलं होतं. हे गाणं पाकिस्तानी लेखक साहिर अली बग्गा यांनी लिहिलं आहे. या गाण्यात आमदार ठाकूर राजा सिंग लोध यांनी थोडाफार बदल करुन ते भारतीय सैन्याला समर्पित केलं”, असा दावा पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आला. या गाण्यात ‘जिंदाबाद पाकिस्तान’च्या जागी लोध यांनी ‘जिंदाबाद हिंदुस्तान’ केलं, असा आरोप पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आला आहे.

“आम्हाला आनंद आहे की तुम्ही या गाण्याची कॉपी केली. त्याचप्रमाणे खरं बोलण्याचीही कॉपी करा”, असं ट्वीट पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केलं.

पाकिस्ताननेच आमचं गाणं कॉपी केलं : आमदार लोध

पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या या आरोपाचं आमदार ठाकुर राजा सिंग लोध यांनी खंडण केलं. “दहशवादाला जन्म देणाऱ्या पाकिस्तानचं गाणं कॉपी करण्याची कधीही वेळ येणार नाही”, असेही आमदार ठाकूर राजा सिंग लोध म्हणाले.

“ज्या देशात दहशतवादी तयार होतात, तिथे गायकही आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाटत आहे. आम्ही  2010 पासून रामनवमीच्या निमित्ताने भगवान राम आणि देशासाठी नवं गाणं तयार करतो. त्यासाठी आम्हाला पाकिस्तानचं गाणं कॉपी करण्याची गरज नाही. आमच्या भारतात एकापेक्षा एक गायक आणि लेखक आहेत. मला वाटतं की पाकिस्ताननेच माझ्या गाण्याची कॉपी केली आहे”, असा पलटवार आमदार ठाकूर राजा सिंग लोध यांनी पाकिस्तानवर केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *