लबाड चीन जगासाठी धोकादायक, तैवानचा हल्लाबोल, भारताला अप्रत्यक्ष समर्थन

तैवानला केवळ चिनी लढाऊ विमानांना पळून लावण्यासाठी सुमारे 90 कोटी डॉलर्स खर्च करावे लागले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:13 AM, 10 Oct 2020

तैपाई: तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आपल्या भाषणात देशाच्या राष्ट्रपती त्‍साई इंग वेन यांनी चीनवर जोरदार हल्ला केला. जगभरातील लोकशाहीसाठी चीन हा एक धोका आणि आव्हान बनला आहे आणि भारत-चीन सीमेवरचा संघर्ष हे त्याचेच उदाहरण आहे, असंही तैवानच्या राष्ट्रपती वेन यांनी असेही म्हटले आहे. जर चीन समानता आणि सन्मान राखत असेल आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारू इच्छित असतील, तर आम्ही अर्थपूर्ण चर्चेसाठी तयार आहोत, असंही राष्ट्रपती त्‍साई इंग वेन यांनी स्पष्ट केलं आहे. तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त त्या बोलत होत्या. (taiwan president tsai ing wen criticism on china)

राष्ट्रपती वेन आपल्या भाषणात म्हणाल्या, “दक्षिण चीन समुद्रातील विवाद, चीन-भारतीय सीमेवर संघर्ष, हाँगकाँगमधील चीनचे दडपणाचे धोरण स्पष्टपणे दर्शवते की, इंडो-पॅसिफिक प्रदेशात लोकशाही, शांतता आणि समृद्धी गंभीर आव्हानांना सामोरे जात आहेत. आम्ही आपली संरक्षण क्षमता वाढवित आहोत आणि लष्कर हे आमचे भविष्य आहे. ते मजबूत करण्यासाठी कार्य करत राहू, असंही राष्ट्रपती त्‍साई इंग वेन यांनी सांगितलं आहे.

‘चिनी सैन्य पीएलएच्या हालचाली अयोग्य’

आम्ही देशात निरंतर आधुनिक शस्त्रे आणि पाणबुड्या बनवित आहोत. आम्ही उच्च प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम करीत आहोत. चिनी सैन्य पीएलएचे उपक्रम अयोग्य आहेत. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील देश एकत्र येत आहेत, जेणेकरून त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीवर विपरीत परिणाम होणार नाही. जर चीन आपल्या शत्रूला विसरुन समानता आणि सन्मानाच्या जोरावर संबंध सुधारण्यास तयार असेल, तर आम्ही अर्थपूर्ण संवादासाठी तयार आहोत, असंही राष्ट्रपती त्‍साई इंग वेन म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे चिनी सैन्याने तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पुन्हा एकदा तैवानला धमकी दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी चीनने आपले लढाऊ विमानं तैवानच्या सीमेजवळ पाठविली आहेत. तैवानच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत त्यांना तातडीने तेथून हुसकावून लावले. चीनने यावर्षी तब्बल 2,972 पेक्षा जास्त वेळा तैवान सीमेवर आपली लढाऊ विमानं पाठवली आहेत. तैवानला केवळ चिनी लढाऊ विमानांना पळून लावण्यासाठी सुमारे 90 कोटी डॉलर्स खर्च करावे लागले.

तैवानचे उपराष्ट्रपती लाई चिंग ताए यांनी ट्विट केले की, चीनने तैवान राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा आम्हाला भडकवण्यासाठी आपलं लढाऊ विमान आमच्या हद्दीत पाठवले. पण आम्ही आमच्या राष्ट्रीय दिनाचा उत्सव थांबवणार नाही. आम्हाला प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेचे संरक्षण करण्यास कोणीही प्रतिबंधित करू शकणार नाही. यापूर्वी तैवानचे संरक्षणमंत्री म्हणाले होते की, वारंवार चिनी लढाऊ विमानं आमच्या हद्दीत पाठविल्यामुळे आमच्या सैन्यावर दबाव वाढला आहे.

अमेरिका आणि तैवान यांच्यात वाढत्या सहकार्याने चीन बिथरला

संरक्षणमंत्री म्हणाले की, त्यांचा देश गंभीर संकटाचा सामना करीत आहे. दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तैवान सैन्याचं खच्चीकरण करण्यासाठी चीन सातत्यानं आपली लढाऊ विमानं तैवानच्या समुद्राकडे पाठवत आहे. सध्या अमेरिका आणि तैवान यांच्यात वाढत्या सहकार्याने चीन बिथरला आहे. चीनच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन यांनी देशाच्या सुरक्षिततेस बळकटी देण्याचे आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी काम करण्याचे वचन दिले आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

‘ती घुसखोरी तैवानवर कब्जा करण्यासाठीच’, ग्लोबल टाईम्समधून चीनचा धक्कादायक खुलासा

तैवानने चीनचं विमान पाडल्याची चर्चा, घुसखोरीला रोखठोक उत्तर, अधिकृत घोषणेकडे लक्ष

(taiwan president tsai ing wen criticism on china)