मिसाईल लाँच करणारं कम्प्युटरच हॅक, अमेरिकेचा ईराणवर सायबर अटॅक

सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर नवा हल्ला सुरु केलाय, ज्याला अमेरिकेचं ब्रह्मास्त्र मानलं जातंय. रक्तपाताचं युद्ध टाळत अमेरिकेच्या सायबर स्ट्राईकने ईराणच्या लष्कर व्यवस्थेवरच हल्लाबोल केलाय.

  • Publish Date - 8:24 pm, Mon, 24 June 19 Edited By:
मिसाईल लाँच करणारं कम्प्युटरच हॅक, अमेरिकेचा ईराणवर सायबर अटॅक

नवी दिल्ली : अमेरिका आणि ईराण यांच्यात नवं युद्ध सुरु झालंय. या युद्धात ना कोणत्या शस्त्रांची गरज आहे, ना मैदानाची. अमेरिकेने युद्धाची जागा बदलली आहे. सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्यामुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर नवा हल्ला सुरु केलाय, ज्याला अमेरिकेचं ब्रह्मास्त्र मानलं जातंय. रक्तपाताचं युद्ध टाळत अमेरिकेच्या सायबर स्ट्राईकने ईराणच्या लष्कर व्यवस्थेवरच हल्लाबोल केलाय. विशेष म्हणजे ईराणही प्रत्युत्तर देत आहे.

कोणतीही ताकद न वापरता अमेरिकेकडून मुळावर घाव घातला जातोय. धक्कादायक म्हणजे ईराणचे मिसाईल लाँच करणाऱ्या कम्प्युटरवरच अमेरिकेकडून सायबर स्ट्राईक करण्यात आलाय. टँकरवर हल्ला केल्याचा संशय असलेल्या ईराणच्या गुप्तचर संस्थेवरही निशाणा साधण्यात आलाय. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ईराणच्या मुलभूत गोष्टींवर आघात झालाय. तर ईराणकडूनही याला प्रत्युत्तर दिलं जातंय. सायबर सिक्युरिटी कंपनी फायरआयच्या मते, ईराणशी संबंधित APT39, APT33, APT34 या हॅकर्स ग्रुपने अमेरिकेच्या दूरसंचार आणि एअरस्पेस कंपन्यांवर निशाणा साधलाय. मात्र यातून किती नुकसान झालं याची पुष्टी झालेली नाही. अमेरिकेने यापूर्वीही अनेकदा सायबर स्ट्राईकचा मार्ग अवलंबला आहे. शिवाय ईराणमध्येही APT34 हा हॅकर्स ग्रुप 2014 पासून सक्रिय आहे.

यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने ईराणवर सायबर अटॅक केला होता. या हल्ल्यात वापरलेला स्टक्सनेट हा कम्प्युटर व्हायरल इस्रायल आणि अमेरिकेने मिळून तयार केल्याचं बोललं जातं. यामुळे ईराणच्या डिजीटल व्यवस्थेवर मोठा आघात झाला होता. यानंतर ईराणनेही स्वतःची सायबर आर्मी तयार केली आणि अनेक महत्त्वाचे कम्प्युटर ऑफलाईन केले.

सायबर अटॅकला महत्त्व कशामुळे?

जाणकारांच्या मते तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असल्यामुळे सायबर हल्ला गेमचेंजर ठरत आहे. एखाद्या देशाकडे सर्वात शक्तीशाली मिसाईल असतील, मात्र हे मिसाईल लाँच करणारे कम्प्युटरच हॅक केले तर प्रतिस्पर्धी देशाचा तो सर्वात मोठा विजय असतो. यामुळे समोरच्या देशाला गुडघे टेकावे लागतात. येत्या काळात 5G आणि आर्टिफिशिअल इंटिलिजेन्समुळे सायबर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

कोणकोणत्या देशाकडून सायबर हल्ल्याची तयारी?

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या मते प्रत्येक देश सायबर हल्ल्याला तोंड देण्यासाठी सक्षम होत आहे. याशिवाय 30 देश असे आहेत, ज्यांच्याकडे आक्रमक सायबर हल्ल्याची क्षमता आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसीत केलं जात आहे. रशिया, चीन, ईराण आणि उत्तर कोरिया हे आमच्यासाठी धोका असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. रशियाकडे अत्यंत आक्रमक सायबर प्रोग्राम असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. शिवाय जाणकारांच्या मते, उत्तर कोरियाकडे असं शस्त्र आहे, जे काही क्षणात कोट्यवधी डॉलर्सची चोरी करु शकतं. त्यामुळे हा सर्वच देशांसाठी धोका मानला जातो.

अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागनच्या मते, चीनकडून वेगाने सायबर हल्ल्याची क्षमता वाढवण्याची तयारी केली जात आहे. संरक्षण क्षेत्रात घुसून चीन डेटा जमवत आहे, ज्यामुळे भविष्यात सायबर हल्ल्याचा धोका आहे. मात्र या सर्वांमध्ये अमेरिकेची सायबर हल्ल्याची क्षमता सर्वोच्च मानली जाते. अमेरिकेचं सैन्य शक्तीशाली आहेच, मात्र त्याव्यतिरिक्त शत्रूच्या मुलभूत सुविधाच हॅक करण्यासाठी अमेरिकेने सायबर हल्ल्यासाठीही विशेष तयारी केली आहे.

भारतातही डिफेन्स सायबर एजन्सी

जो देश सायबर हल्ल्यासाठी सक्षम होण्याचा प्रयत्न करतोय, तो देश याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ देत नाही. भारताकडूनही असेच प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसात पाकिस्तानकडून सायबर अटॅक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही तयारी केली आहे. थलसेना, नौसेना आणि वायूसेने यांच्या संयुक्त डिफेन्स सायबर एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीकडून सायबर हल्ल्याला तोंड दिलं जाईल. यामध्ये 1000 तज्ञ असतील आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी ही संस्था कार्यरत असेल.