VIDEO: 'बलात्कार पीडिता' मदत मागत होती, लोक म्हणाले वेश्या आहे

बलात्कार पीडित तरुणी जर अनोळखी लोकांकडे मदत मागत असेल तर काय होऊ शकेल?  मदत करण्यापूर्वी लोक तिने कोणते कपडे घातलेत? ती कशी आहे हे न्याहाळतील?  तिने जर मॉडर्न कपडे किंवा स्कर्ट आणि टॉप घातला असेल तर लोक तिला वाईट नजरेनेच पाहतील? बलात्कार पीडितेलाही टोमणे दिले जाऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अबाद नावाच्या एनजीओच्या या व्हिडीओमध्ये एक बलात्कार पीडित तरुणी रस्त्यावर सर्वांकडे मदत मागत असते. एकामागे एक  तरुणांकडे मदतीचा हात पसरते. मात्र तिला जो प्रतिसाद मिळतो तो अत्यंत धक्कादायक आहे.

एक तरुण पीडित मुलीला विचारतो, तू ड्रग्ज घेतलंस आहेस का? दुसरा म्हणतो, माझ्या बहिणीने कधीच असा ड्रेस घातला नसता.

फेसबुकवर हा व्हिडीओ 20 दिवसात किमान 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. बलात्कार पीडितेसोबत समाजात कसं वर्तन केलं जातं यावरुन आता चर्चा, वादाला सुरुवात झाली आहे.

या व्हिडीओतील एक व्यक्ती मुलीला विचारतो, तुला कोणी हानी पोहोचवली आहे का? माझ्याजवळ ये, घाबरु नको. दुसरीकडे एक तरुण मुलीला त्याचं जॅकेट देत असल्याचं दिसून येतं. एक महिलाही त्या मुलीला मदत करताना दिसते, पण बहुसंख्य लोकांनी त्या मुलीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं.

दुसरा व्यक्ती त्या मुलीला विचारतो, तू नशेत आहेस का? आणखी एक जण म्हणतो, ती तर एक वेश्या आहे, कोणीतरी तिला फेकून दिलं आहे. त्यामुळेच ती ओरडतेय.

या व्हिडीओचं सत्य काय?

या व्हिडीओतील मुलगी बलात्कार पीडितेची अॅक्टिंग करत आहे. मात्र लोकांच्या प्रतिक्रिया खऱ्या आहेत. लेबनान इथं हा सोशल प्रयोग करण्यात आला. लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात, हे याद्वारे जाणून घेण्यात आलं.

हा व्हिडीओ शेअर करताना अबाद एनजीओने म्हटलंय, “एक बलात्कार पीडित रस्त्यावर मदतीचा हात पसरते तेव्हा काय होतं? नेमकी लाज कशाची वाटायला हवी?

लैंगिक हिंसेविरोधात 16 दिवसांच्या अभियानाअंतर्गत अबाद एनजीओने #ShameOnWho ? हे कॅम्पेन सुरु केलं होतं.

या व्हिडीओत मनल नावाच्या तरुणीने बलात्कार पीडितेची भूमिका साकारली आहे. लोकांच्या वास्तविक प्रतिक्रिया समाजासमोर आणणं हा उद्देश असल्याचं एनजीओचं म्हणणं आहे.