एक लाखाच्या बदल्यात 32 लाख रुपये आणि साडेसहा एकर जमीन; बारामतीत सहा सावकारांवर गुन्हा दाखल

सहा सावकारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • नावीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 22:02 PM, 13 Jan 2021
एक लाखाच्या बदल्यात 32 लाख रुपये आणि साडेसहा एकर जमीन; बारामतीत सहा सावकारांवर गुन्हा दाखल

पुणेः आईच्या उपचारासाठी व्याजाने घेतलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात 32 लाख रुपये रोख आणि साडेसहा एकर जमीन घेतल्यानंतरही पुन्हा पैशांसाठी तगादा लावणाऱ्या सहा सावकारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (32 Lakh And Six Half Acres Of Land In Exchange For One Lakh; Case Filed Against Six Moneylenders In Baramati)

इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील नामदेव ढोले यांनी महादेव सांगळे यांच्याकडून आईच्या उपचारासाठी 1 लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात एक एकर जमीन लिहून दिली होती. पुढे व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी फिर्यादीच्या भावाची दीड एकर जमीन संबंधित सावकाराने स्वत:च्या नावे करून घेतली. त्यानंतरही वसुलीसाठी तगादा सुरू असल्यानं फिर्यादीने आणखी दोन एकर जमीन मल्लेश कदरापूरकर यांच्याकडे गहाण ठेवून त्यांची रक्कम महादेव सांगळे याला दिली.

व्यवहार मिटत नसल्याने अखेर त्यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार

फिर्यादीने टप्प्याटप्प्याने तब्बल साडेसहा एकर जमीन आणि 32 लाख रुपये रोख दिले. मात्र तरीही व्यवहार मिटत नसल्याने अखेर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या तक्रारीवरून महादेव सांगळे, आशा सांगळे, मल्लेश कदरापूरकर, बिभीषण ढोले, भास्कर वणवे आणि दत्तात्रय वणवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अवैध सावकारांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतला

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अवैध सावकारांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी रिक्षाला स्पीकर लावून अवैध सावकारांविरुद्ध बिनधास्त फिर्याद देण्याचं आवाहनही केलं होतं. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हाती सूत्रे आल्यानंतर अवैध सावकारांवर त्यांनी निशाणा साधला होता. ज्यांच्याकडे सावकारी करण्याचा परवाना नाही, अशांनी अवैध पद्धतीनं पैसेवसुली केल्यास ती होऊ शकणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला होता. बारामतीत एका व्यापाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्याच्यावर उपचारही सुरू होते. सावकारांच्या जाचाला कंटाळून त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांना संशय होता. पोलिसांनी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागलीत.

संबंधित बातम्या

“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस

32 Lakh And Six Half Acres Of Land In Exchange For One Lakh; Case Filed Against Six Moneylenders In Baramati