600 पोलिसांच्या बदल्या, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या प्रयोगाची राज्यभर चर्चा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयात दरबार घेतला. यामध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग दिले.

600 पोलिसांच्या बदल्या, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या प्रयोगाची राज्यभर चर्चा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयात दरबार घेतला. यामध्ये त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग दिले. या अनोख्या बदली पद्धतीमुळे पोलीस खात्यातील पारदर्शकता सर्वांसमोर आली आहे. केवळ दोन तासांच्या दरबारात त्यांनी सुमारे 600 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेची तीन युनिट नव्याने तयार केली आहेत. त्यामुळे या चौक्यांसह गुन्हे शाखेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात मागील तीन महिन्यांपासून पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे अंतर्गत बदलीसाठी अनेक अर्ज येत होते. त्यामुळे त्यांनी बदल्यांसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार भरवून बदल्या करून दिल्या.

पोलीस खात्यात बदल्यांसाठी बड्या हस्तींचा संपर्क आणि आर्थिक ताकद महत्वाची आहे, अशी चर्चा वारंवार होते. यामुळे इमानदारीने काम करणारे कर्मचारी दडपणाखाली राहतात.

त्यावर तोडगा काढत पोलीस आयुक्तांनी मैदानावर बोलावून सर्वांच्या समक्ष बदल्या केल्या. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हुरूप आला आहे. इच्छेप्रमाणे बदल्या केल्या असून आता कामात कसूर करायचा नाही, असा सल्ला देखील आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI