नसीरुद्दीन शाहांसाठी आशुतोष राणा मैदानात!

नसीरुद्दीन शाहांसाठी आशुतोष राणा मैदानात!

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी देशातील सध्याच्या वातावरणासंबंधी केलेल्या एका विधानानंतर एकच गदारोळ झाला. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन, विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांनी नसीरुद्दीन शाहांविरोधात सोशल मीडियावरुन विरोध सुरु केला आणि एकच टीका सुरु केली. त्यावरुन मोठी चर्चा गेल्या दोन-तीन दिवसात सुरु असताना, आता नसीरुद्दीन शाह यांच्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी एकवटताना दिसत आहेत.

काय म्हणले होते नसीरुद्दीन शाह?

“समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

वाचा : नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन’, भाजपचं टीकास्त्र

“कुठल्याही भीतीविना सगळ्यांना आपलं मत आपल्या मित्रांशी किंवा कुणाही लोकांशी व्यक्त करण्याचा अधिकार असायला हवा. मात्र, असे कुणी व्यक्त केल्यावर आपण फारच तातडीने व्यक्त होतो. जर कुणी असे (नसीरुद्दीन यांनी जसे वक्तव्य केले.) वक्तव्य केले, तर ते केवळ ऐकायला नको, तर त्यावर विचार करायला हवा.”, असे मत अभिनेते आशुतोष राणा यांनी व्यक्त केले.

 

मधुर भंडारकर काय म्हणाले?

“प्रत्येकाला बोलण्याच अधिकार आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. इथे काही भीती आहे, असे मला वाटत नाही. देशात प्रत्येकजण स्वतंत्र आहे, समान आहे. आणि आपल्या येथे प्रत्येकजण मत व्यक्त करु शकतं, ही आपली खासियत आहे. त्यामुळे आपल्या येथे असहिष्णुता आहे, असे मला वाटत नाही.” असे सिनेदिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणाले.

अजून किती स्वातंत्र्य पाहिजे? : अनुपम खेर

देशात एवढं स्वातंत्र आहे, की सैन्याविषयी अपशब्द वापरले जातात. एअर चीफविषयी वाईट बोललं जातं आणि सैनिकांवर दगडफेक केली जाते. तुम्हाला या देशात अजून किती स्वातंत्र्य हवंय? असा तिखट सवाल अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाह यांना केला.