भारतातही बोईंग-737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणावर बंदी

भारतातही बोईंग-737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणावर बंदी

नवी दिल्ली : इथिओपियाची राजधानी अॅडिस अबाबा येथे रविवारी इथियोपियन एयरलाइन्सचं बोईंग-737 मॅक्स 8 विमान कोसळलं होतं. या दुर्घटनेत 157 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरातील देशांनी बोईंग-737 मॅक्स 8 विमानावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यातच आता भारतानेही या विमानावर निर्बंध लावले आहेत. स्पाईस जेट या विमान कंपनीजवळ 12 बोईंग -737 मॅक्स 8 विमानं आहेत. तप जेट एअरवेजकडे अशी पाच विमानं आहेत.

हवाई वाहतूक महासंचालनालयाने ट्विटरवर या विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. जोपर्यंत हे विमान सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम होत नाहीत, तोपर्यंत हे उड्डाण करु शकत नाही. प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, असेही नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले.

सहा महिन्यात दोनदा बोईंग दुर्घटनाग्रस्त

रविवारी अॅडिस अबाबा येथे इथियोपियन एयरलाइन्सचं बोईंग-737 मॅक्स 8 विमान कोसळलं होतं. या दुर्घटनेत चार भारतीयांसोबत विमानातील सर्व 157 लोकांचा मृत्यू झाला. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लायन एअरलाईन्सचं बोईंग विमान इंडोनेशियात दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यामध्येही 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड केली जाऊ शकत नाही- सुरेश प्रभू

हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व विमान कंपन्यांची आपत्कालीन बैठक घेण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यांच्या प्रवासावर याचा  कमीतकमी प्रभाव पडावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सुरेश प्रभूंनी सांगितलं.

स्पाईस जेटने सांगितले की, “बोईंग आणि हवाई वाहतूक महासंचालनालयासोबत आमची चर्चा सुरु आहे. आमच्यासाठी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या आदेशांनुसार आम्ही या विमानांचे उड्डाण थांबवले आहे. तसेच युरोपीय संघातील अनेक देशांनी या विमानांच्या उड्डाणावर निर्बंध घातले आहेत.”

चीननेही बोईंग विमानं सेवेतून काढली

भारतासोबतच नेदरलँड, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटिना आणि ओमान या देशांनी बोईंग-737 मॅक्स 8 विमानांवर निर्बंध लावले आहेत. तर चीननेही बोईंग-737  मॅक्स 8 विमानं व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. तसेच एअर शटल एयरलाइन, दक्षिण कोरियाचं इस्टर जेट, दक्षिण अफ्रिकेचं कॉमर या विमान कंपन्यांनीही बोईंग-737 मॅक्स 8 विमानांचे उड्डाण थांबवले आहेत.

Published On - 8:59 am, Wed, 13 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI