राज्यभरातील गाढवांना संरक्षण द्या, जानकरांच्या मंत्रालयाचे आदेश

राज्यभरातील गाढवांना संरक्षण द्या, जानकरांच्या मंत्रालयाचे आदेश

मुंबई : पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या विभागाने गाढवांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. औषध आणि इतर वापरांसाठी गाढवांच्या कत्तली होण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांची संख्या कमालीची घटली आहे. हेच हेरुन मंत्री महादेव जानकर यांच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्हाधिकऱ्यांना नोटीस पाठवून, गाढवांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत.

गाढवांच्या संरक्षणांसदर्भात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवले आहे. पशुसंवर्धन हे विभाग मंत्री महादेव जानकर यांच्या अख्त्यारित येते.

राज्यातील गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गाढवं नामशेष होतील, अशी शक्यता आहे. याशिवाय गाढवांचे अवयव, रक्त याचा वापर अवैधरित्या पशु खाद्यांमध्ये पूरक म्हणून वापरण्यात येतो. तसेच, गाढवांच्या कातडीचा वापर चिनी लोक कर्करोग आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी अवैधरित्या करतात, असे राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सक्त आदेश दिले आहेत की, आपापल्या जिल्ह्यात कुठेही गाढवांची अवैध कत्तल होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.

दरम्यान, राज्य सरकारने याआधी वाघांच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र, ती मोहीम वन मंत्रालयाने सुरु केली होती. आता पशुसंवर्धन विभागाने गाढवांच्या संरक्षणासाठी मोहीम हाती घेतली आहे.


Published On - 2:20 pm, Wed, 8 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI