चेकपोस्टवरील पोलिसाला जनावर तस्करांनी भरधाव गाडीखाली चिरडलं!

चेकपोस्टवरील पोलिसाला जनावर तस्करांनी भरधाव गाडीखाली चिरडलं!

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा छत्रपती चिडे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी भरधाव गाडीने पोलिसाला गाडीखाली चिरडलं. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्ट येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. प्रकाश मेश्राम असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

नागपूर-चंद्रपूर महामार्गावरुन जनावरांची तस्कारी केली जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेट्स लावून गाड्या तपासून सोडण्यास सुरुवात केली. एका गाडीवर संशय आल्यानंतर तिला थांबवण्याचा प्रयत्न चेकपोस्टवरील पोलिसांनी केला. मात्र, भरधाव वेगात आलेल्या गाडीने पोलिस शिपाई प्रकाश मेश्राम यांना उडवलं आणि गाडीखाली चिरडलं. या घटनेत पोलिस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील आहेत.

याआधीही पोलिसाची हत्या

याआधीही विदर्भात पोलिसाची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेला काही महिनेसुद्धा उलटले नाहीत. भंडारा जिल्ह्यातील पवनीकडून तोरगावमार्गे मोठ्या प्रमाणावर दारुची अवैध वाहतूक सुरु असल्याचे कळल्यावर, नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती किसन चिडे यांनी तातडीने काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मौशीला गेले होते. पण त्यावेळी दारुमाफियांनी चिडे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा बळी घेतला. छत्रपती चिडे हे आधी पोलीस कर्मचारी होते. त्यानंतर अभ्यास आणि मेहनतीच्या जीवावर ते पीएसआय झाले होते. नागभीडचे पीएसआय सुट्टीवर गेल्यामुळे त्यांना नागभीडच्या प्रभारी पदाचा कारभार नुकताच देण्यात आला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI