आयुषमानच्या चित्रपटात दादा कोंडकेंच्या ‘ढगाला लागली कळ’चा रिमेक

आयुषमान खुराणाच्या आगामी ड्रीमगर्ल चित्रपटात दादा कोंडके यांच्या ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळं’ या गाण्याचा रिमेक केला जाणार आहे

आयुषमानच्या चित्रपटात दादा कोंडकेंच्या 'ढगाला लागली कळ'चा रिमेक

मुंबई : हरहुन्नरी अभिनेता आयुषमान खुराणा (Ayushmann Khurana) ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. आगामी चित्रपटात आयुषमान मराठी सिनेसृष्टीतील हास्यसम्राट दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या गाण्यावर थिरकणार आहे. ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळं’ (Dhagala Lagli Kala) या गाण्याच्या रिमेकमध्ये आयुषमान दिसणार आहे.

‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या दादा कोंडके यांच्या चित्रपटात हे गाणं होतं. या गाण्यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची लोकप्रिय जोडी झळकली होती. ‘ढगाला लागली कळ’ या गाण्याची लोकप्रियता कित्येक दशकांनंतरही कायम आहे. अनेक ठिकाणी हे गाणं वाजू लागल्यानंतर प्रेक्षकांची पावलं थिरकायला लागतात.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा रिमेक कराण्याची कल्पना ‘ड्रीमगर्ल’ची कल्पना निर्माती एकता कपूरने बोलून दाखवली होती. गणेशोत्सवादरम्यान हे गाणं प्रदर्शित करणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी सांगितलं.

याआधी ‘दिल का टेलिफोन’ या गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. ड्रीमगर्ल चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आयुषमान चित्रपटात साकारत असलेली लोकेश बिष्टची व्यक्तिरेखा महिलेच्या आवाजात रेडिओ शो करत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट 13 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आतापर्यंत आयुषमानचे विकी डोनर, शुभमंगल सावधान, बधाई हो, दम लगा के हैशा, आर्टिकल 15, अंदाधुन यासारखे सामाजिक किंवा लैंगिक विषय हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळणारे चित्रपट गाजले आहेत. यानंतर आयुषमान ‘बाला’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

आयुषमानच्या मानधनात वाढ

आयुषमानला अंदाधुन चित्रपटातील भूमिकेसाठी काहीच दिवसांपूर्वी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आयुषमानने आपली फी तिप्पट केल्याची चर्चा आहे. यापूर्वी एका जाहिरातीसाठी एक कोटीच्या घरात मानधन आकारणारा आयुषमान आता तीन कोटींच्या खाली ऐकत नसल्याचं म्हटलं जातं. जाहिरातींसोबतच सिनेमाचं मानधनही आयुषमान वाढवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI