आईच्या डोळ्यांनी अभ्यास, अंधत्वावर मात करुन दहावीत 71 टक्के

जिद्द, चिकाटी आणि आईची साथ या ताकदीवर जन्मत:च अंधत्व वाट्याला आलेल्या विद्यार्थ्याने दहावीत 71.20 टक्के गुण मिळवले आहेत.

आईच्या डोळ्यांनी अभ्यास, अंधत्वावर मात करुन दहावीत 71 टक्के

वर्धा : जिद्द, चिकाटी आणि आईची साथ या ताकदीवर जन्मत:च अंधत्व वाट्याला आलेल्या विद्यार्थ्याने दहावीत 71.20 टक्के गुण मिळवले आहेत. रोहित तिवारी असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहितने दहावीत 71.20 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये पहिले स्थान मिळवले. मात्र या यशासाठी रोहितची आई त्याचा सारथी बनली. आईमुळेच रोहितने हे यश गाठलं आहे.

रोहितचे वडील गणेश तिवारी हे ऑटो चालवत आपल्या संसाराचा गाडा चालवतात. पत्नी ममता आणि घरात दोन मुले असा त्यांचा सुखी संसार आहे. रोहित हा जन्मत: दिव्यांग आहे. मात्र याचे त्यांना दुःख नाही. कारण रोहितने स्वतःला सिद्ध केलंय, बुद्धीच्या आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. दहावी पहिली पायरी असून पुढे स्पर्धा परीक्षा तसेच शिक्षक बनण्याची इच्छा रोहितची आहे. यंदाही त्याला 90 टक्के गुण मिळतील अशी आशा होती. पण असे असले तरी त्याच्या अडचणी पाहता 71 टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान रोहितने पटकावला आहे.

अंधत्वावर  मात करण्यासाठी रोहित आपल्या आईच्या डोळ्याने अभ्यास करु लागला. ऐकायला हे वेगळंच वाटत असलं तरी रोहितच्या आईने हे करून दाखवलं. सहावी पास असलेली आई मुलासाठी स्वत: शाळेत गेली एवढंच नव्हे, तर तिने ब्रेल लिपी शिकत मुलाच्या उज्वल भविष्यासाठी हातभार लावला. रोहितच्या या यशामागे आईचा मोलाचा वाटा असल्याचे रोहितचे वडील सांगतात.

रोहितने दहावीत 71.20 टक्के गुण घेत डोळस असलेल्यांना लाजवेल असं यश संपादन केलं आहे. सकाळपासून तो अभ्यासात व्यस्त राहायचा. सातत्यपूर्ण अभ्यासातून त्यानं हे यश मिळवलं. यासाठी आईची मेहनत महत्वाची आहे. भविष्यात एमपीएससीची परीक्षा द्यायची तसंच शिक्षक होण्याची त्याची इच्छा आहे.

सहावी पास असलेली रोहितची आई ममता तिवारी मुलासाठी ब्रेल लिपी शिकल्या. एवढंच नव्हे तर त्याच्यासोबत शाळेत आणि शिकवणीला जात होत्या. रोहित शिकून मोठा व्हावा यासाठी ही आईची तगमग. रोहितसाठी त्या पहाटे उठायच्या. सकाळी तसेच शाळेतून आल्यानंतर त्याचा अभ्यास घ्यायच्या. रोहितसाठी स्वतः ब्रेल लिपी शिकत त्यांनी रोहितला शिकवलं.

आई ही  मुलासाठी अनेक स्वप्न उराशी बाळगते. या स्वप्नांना पूर्ण करण्याकरीता ती अहोरात्र झटत सुद्धा असते. इथे तर रोहितने आईच्या डोळ्यांनी अभ्यास करत यशाचे शिखर गाठले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI