वऱ्हाडींच्या डान्समुळे पूल कोसळला, नवरदेव नाल्यात पडला

वऱ्हाडींच्या डान्समुळे पूल कोसळला, नवरदेव नाल्यात पडला

लखनऊ: उत्तर प्रदेशातील नोएडा इथं एका लग्न सोहळ्यादरम्यान अजब प्रकार घडला. लग्नातील वऱ्हाडी ऐन जल्लोषात एका पुलावर नाचताना पूल कोसळला. यामुळे सर्व वऱ्हाडी तर नाल्यात कोसळलेच, शिवाय नटून थटून आलेला नवरदेवही नाल्यात पडला. 30 ते 40 जण लग्नाच्या हॉलजवळ नाचत होते, त्यावेळी ही घटना घडली. नाल्यात पडलेल्या सर्वांना शिडी लावून बाहेर काढावं लागलं.

मिळालेल्या माहितीनुसार न्यू कोंडली इथंल्या फूलसिंह यांची मुलगी सोनू हिचं लग्न इंदिरापूरम इथल्या अमितशी होतं. यासाठी नोएडातील सेक्टर 52 इथं ऑलिव गार्डन लग्नाचा हॉल ठरवला होता. त्यावेळी शनिवारी रात्री 9 च्या सुमारास नवरदेव अमित बँड बाजा बारात घेऊन मंडपाबाहेर आला.

मंडपाबाहेर एक पूल होता. त्या पुलावर सर्व वऱ्हाडी नाचत होते. जोरजोरात डान्स सुरु असताना कमकुवत झालेल्या पुलाचा स्लॅब कोसळला आणि सर्व वऱ्हाडी डान्सर थेट नाल्यात कोसळले. त्यांच्यासोबत नवरदेवही नाल्यात पडला. या घटनेत तीन जणांना दुखापत झाली आहे.

कपडे बदलून नवरदेव पुन्हा सावधान वऱ्हाडींसह नवरदेवही नाल्यात कोसळला. सुदैवाने नवरदेवाला काही दुखापत झाली नाही. त्याने कपडे बदलून पुन्हा लग्नाचे विधी पूर्ण केले. मात्र या सर्व झटापटीत नवरदेवाची अंगठी नाल्यात हरवली. शिवाय अनेक वऱ्हाडींचे मोबाईलही नाल्यात पडून खराब झाले.

या घटनेनंतर वऱ्हाडींनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर मंगल कार्यालयाच्या मालकाने जखमींच्या उपचाराचा खर्च देण्याचं कबुल केल्याने गोंधळ शांत झाला. त्यानंतर वऱ्हाडींच्या जेवणाच्या पंगती उठल्या आणि सर्वजण जिकडे तिकडे रवाना झाले.

Published On - 10:20 am, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI