स्विगीवरुन मागवलेल्या जेवणात रक्ताने माखलेलं बँडेज

स्विगीवरुन मागवलेल्या जेवणात रक्ताने माखलेलं बँडेज

चेन्नई : स्विगी (swiggy) या फूड अॅप वरुन चेन्नईच्या एका व्यक्तीने चिकन शेजवान चॉपसी ऑर्डर केली. मात्र यामध्ये चक्क रक्ताने माखलेलं बँडेज आढळलं. हे बघून त्या व्यक्तीला धक्काच बसला, कारण ते बँडेज दिसेपर्यंत त्याने अर्धी चिकन शेजवान चॉपसी खाल्लेली होती. यानंतर त्याने लगेच चॉप एन स्टिक्स रेस्टॉरंट (जिथून ही चिकन शेजवान चॉपसी ऑर्डर केली होती) गाठले. मात्र या रेस्टॉरंटने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली.

चेन्नई येथील बालामुर्गन दीनदयालन (Balamurugan Deenadayalan) नावाच्या व्यक्तीने स्विगी या फूड अॅपवरुन चॉप एन स्टिक्स रेस्टॉरंटमधून चिकन शेजवान चॉपसी ऑर्डर केली. जवळपास अर्धी चिकन शेजवान चॉपसी खाल्ल्यानंतर त्यांना रक्ताने माखलेलं बँडेज त्या पदार्थात दिसलं. या प्रकारानंतर बालामुर्गन यांनी रेस्टॉरंट गाठलं आणि त्यांना या प्रकाराबाबत जाब विचारला. मात्र त्यांना रेस्टॉरंट मालकाकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर घडलेला प्रकार सांगत पोस्ट केली.

बालामुर्गन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, रेस्टॉरंटने मला त्या पदार्थाच्या बदल्यात दुसरा पदार्थ ऑफर केला. मात्र, इतक्या मोठ्या चुकीनंतर कोण असले दूषीत पदार्थ खाणार. बालामुर्गन यांनी याबाबत स्विगीशीही संपर्क साधला मात्र तिथूनही कुठला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बालामुर्गन यांनी रेस्टॉरंट आणि स्विगी यांच्याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र काही वेळाने त्यांनी पोस्ट एडिट करत लिहिले की, त्यांचे रेस्टॉरंट आणि स्विगीशी बोलणे झाले आहे. त्यांनी अशी चूक पुन्हा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याची ग्वाही दिली, तसेच याबाबत तपास करण्यात येईल असेही रेस्टॉरंट आणि स्विगीने सांगितल्याचे बालामुर्गन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्विगीने याबाबत खंत व्यक्त करत बालामुर्गन यांची माफी मागितली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

Published On - 10:52 am, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI