मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, दौरा मध्येच सोडून मुंबईकडे रवाना

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, दौरा मध्येच सोडून मुंबईकडे रवाना

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. मुख्यमंत्री बुलडाण्यावरुन वाशिमकडे निघाले होते, त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे मुख्यमंत्री थेट औरंगाबादकडे रवाना होऊन ते तिथून मुंबईकडे येत आहेत. मुख्यमंत्र्यांचं पोट आणि डोकं दुखत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर, डॉक्टरांची टीम तपासणीसाठी तिथे पोहोचली.

मुख्यमंत्र्याचं डोकं दुखू लागल्यामुळे ते दौरा अर्धवट सोडून माघारी फिरले. ते कारने औरंगाबादला आले. तिथून विमान किंवा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यामुळे औरंगाबादमधील सिग्नल बंद करुन रस्ता मोकळा ठेवण्यात आला. त्यानंतर ते तातडीने औरंगाबद विमानतळावर दाखल झाले. तिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली.

शिवसेना भाजपची घासाघीस

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकपूर्व युतीसाठी शिवसेनेनं भाजपला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपाचे बडे नेते मातोश्रीवर चर्चेसाठी येणार असल्याची बातमी येत असतानाच, शिवसेनेकडून अल्टिमेटमची भाषा केली जात असल्याचं समजतंय.

देशात भाजपचे पंतप्रधान हवे असतील तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहीजे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटंलं. ‘युतीसाठी राष्ट्रीय नेते ‘मातोश्री’वर आले तर त्यांचे स्वागत असेल. युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, तसा विडाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उचलल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


Published On - 3:33 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI