भगवान बाबांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांनी रक्ताचं नातं तोडलं : धनंजय मुंडे

भगवान बाबांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांनी रक्ताचं नातं तोडलं : धनंजय मुंडे

बीड : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच परळीत गेले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला अतापर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भावूक झाले.

धनंजय मुंडे यांनी 2012 साली भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर सात वर्षांनंतर धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचं नातं तोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे स्वाभाविक आहे की, पक्षामध्ये काहीच स्थान राहिलं नव्हतं. त्यामुळे तो निर्णय घ्यावा लागला.’

यापुढे ते म्हणाले की, ‘तो निर्णय घेतल्यानंतर अनेकजण म्हणाले की, असा निर्णय का घेतला? कशासाठी निर्णय घेतला? हाच पक्ष का? तोच पक्ष का? बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून पाच वर्ष बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मी वावरलो. त्यानंतर आज ही जबाबदारी मिळत आहे, हे दिवस येत आहेत.’

“मागे पाहिलं की, ते कष्ट आठवतात. स्वर्गीय आण्णांची माझ्याप्रतीची काळजी आठवते. पण एक नक्की आहे की, सर्वांचे आशीर्वाद मिळाले. उशिरा का होईना, सत्याचा विजय होतो. त्याच्यामागे नियती उभी राहते. आज सत्याच्यामागे नियती उभी राहिली आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

“मंत्री झाल्यानंतर परळीत येण्याची उत्सुकता होती. निवडणुकीत परळी-बीडच्या जनतेला जो शब्द दिला आहे तो येत्या पाच वर्षात पूर्ण करणार आहे. परळी-बीडच्या जनतेचे उत्पन्न दुप्पट करणार”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली आहे. त्याबाबत प्रश्व विचारला असता “स्व. मुंडेसाहेब विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदा भगवान गडावर गेले तेव्हा त्यांनाही विरोध झाला होता, त्यांच्याही ताफ्यावर दगडफेक झाली होती, मात्र नंतर भगवान गडावर अभूतपूर्व स्वागत झालं, माझ्याबाबतही तसंच घडलं, असे मुंडे म्हणाले. याशिवाय “पूर्वी मी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतो, आता मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक राहीन”, असे देखील मुंडे म्हणाले.

Published On - 10:59 am, Fri, 10 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI