शिवसेनेच्या आश्वासनपूर्तीआधीच नागपूरमध्ये 10 रुपयात जेवणाची थाळी

शिवसेनेच्या आश्वासनपूर्तीआधीच नागपूरमध्ये 10 रुपयात जेवणाची थाळी
शिवभोजन थाळी

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. त्यातील एक घोषणा म्हणजे केवळ 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करुन देणे (Dinner or Lunch in 10 Rupees scheme).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Dec 16, 2019 | 4:35 PM

नागपूर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. त्यातील एक घोषणा म्हणजे केवळ 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करुन देणे (Dinner or Lunch in 10 Rupees scheme). निवडणुका होऊन आता शिवसेनेचा मुख्यमंत्रीही झाला, मात्र अद्याप 10 रुपयांच्या थाळीचं आश्वासन पूर्ण होणं बाकी आहे. असं असलं तरी शिवसेनेच्या आश्वासन पूर्तीआधीच नागपूरमध्ये 10 रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्यात येत आहे. हा उपक्रम नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनासाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी सुरु केला (Dinner or Lunch in 10 Rupees scheme).

नागपूर पोलिसांनी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसाठी कामाच्या ठिकाणाजवळच 10 रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना आपली काम करत असताना जेवणासाठी कुठेही जाण्याची गरज पडू नये, यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचं सांगितलं जात आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन आजपासून (16 डिसेंबर) सुरू झालं. या अधिवेशनासाठी 6 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कर्तव्यावर तैनात आहेत. त्यात 2 हजार पोलीस राज्याबाहेरुन आले. या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना आपल्या जागेवरून कोठेही जाता येत नाही.

अशा स्थितीत बाहेरुन आलेल्या पोलिसांना हॉटेल्सही माहीत नसतात. त्यावेळी पोलिसांच्या जेवणाचा मोठा प्रश्न तयार होतो. म्हणूनच या पोलिसांना जागेवरच चांगलं आणि गरम जेवण मिळावं यासाठी 10 रुपयांमध्ये थाळी देण्यात आली आहे. पोलिसांच्या कामाच्या ठिकाणीच हे जेवणाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. पोलिसांना 10 रुपयांच्या थाळीसाठी जेवणाचे कुपन देण्यात येणार आहे. हे कुपन देऊन ते अगदी बिनदिक्कतपणे आपली जेवणाची थाळी मिळवू शकणार आहे.

पोलीस आयुक्त नागपूर भूषण कुमार उपाध्याय यांनी या योजनेची माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले, “पोलिसांना अधिवेशन काळात जेवणाचा भत्ता मिळतो. मात्र, त्यांना वेळच्या वेळी चांगलं जेवण मिळेलच याची काही निश्चिती नसते. त्यामुळे नागपूर पोलिसांचं हे अभियान नक्कीच बाहेरून आलेल्या पोलिसांसाठी फायद्याचं ठरेल.”

शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार राज्यात आल्यानंतर त्यांच्या अनेक आश्वासनांची पूर्ती कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. विरोधकांनीही यावरुनच त्यांना घेरलं आहे. त्यातच शिवसेनेच्या 10 रुपयांमध्ये थाळीच्या आश्वासनाचाही समावेश आहे. आता नागपूर पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे सध्या नागपुरात शिवसेनेने आश्वसनपूर्ती करण्याआधीच नागपूरमध्ये 10 रुपयांत जेवणाची थाळी सुरु झाल्याची जोरदार चर्चा आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें