वायएस जगनमोहन रेड्डींचा मेगाप्लॅन, आंध्रात पाच जातीचे पाच उपमुख्यमंत्री

"प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे."

वायएस जगनमोहन रेड्डींचा मेगाप्लॅन, आंध्रात पाच जातीचे पाच उपमुख्यमंत्री

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच उपमुख्यमंत्री असतील. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात घोषणा केली. एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्यांक आणि कापू अशा पाच समाजातील उपमुख्यमंत्री असतील. आंध्र प्रदेशच्या निमित्ताने देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्री असतील. चंद्राबाबू नायुडू यांच्या सरकारमध्ये बीसी आणि कापू अशा दोन समाजातील उपमुख्यमंत्री होते.

वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमधील 25 मंत्री येत्या शनिवारी शपथग्रहण करतील. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाची फेररचना सुद्धा केली जाईल.

वाचा : जगनमोहन रेड्डी : वडिलांचं मुख्यमंत्री असताना निधन ते पुन्हा सत्तेवर विराजमान

“प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे. आपल्या वायएसआर काँग्रेसचं सरकार आणि आधीचं चंद्राबाबूंचं सरकार यातील फरक लोकांना दाखवून द्यायला हवं.” असेही वायएस जगनमोहन रेड्डी म्हणाले.

आंध्र प्रदेशात एकहाती सत्ता

वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात 25 पैकी 22 जागा मिळवल्या आहेत. तेलंगणाच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीचा त्यांनी दारुण पराभव केला. जगनमोहन रेड्डींनी कर्नाटकातून 1999-2000 साली एका कंपनीची स्थापना करुन व्यवसायात प्रगती केली. वडील वायएसआर 2004 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ईशान्य भारतापर्यंत त्यांनी व्यवसाय वाढवला. सिमेंट यंत्र, मीडिया आणि निर्माण क्षेत्रात या व्यवसायाने हात पसरले.

2014 च्या पराभवानंतर संघर्ष

याच काळात 2014 मध्ये टीडीपीकडून वायएसआर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजकीय गणित समजण्यासाठी रेड्डी यांनी 341 दिवसांची पदयात्रा काढली. पराभवाची कारणं समजणे आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी राज्यभर पायी फिरले. राज्यातील 134 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी जवळपास दोन कोटी लोकांशी संवाद साधला. या यात्रेतूनच वायएसआर काँग्रेसने लोकांमध्ये जनसंपर्क प्रस्थापित केला आणि त्याची पावती या निवडणुकीत मिळाली. 175 जागा असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआरने तब्बल 151 जागा मिळवल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI