चार वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या, बलात्कार की नरबळी?

चार वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या, बलात्कार की नरबळी?

खोपोली (रायगड) : शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. या चिमुरडीचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मंगळवार 12 फेब्रुवारीपासून ही चिमुरडी बेपत्ता होती.

आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेल नगर येथील आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आले. चिमुरडीचे धड आणि शीर वेगवेगळे करून झाडीत वेगवेगळया ठिकाणी फेकण्‍यात आले होते. चिमुरडीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना आहे.

चिमुरडीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुरडीचे वडील ट्रॅक्टर चालक आहेत, तसेच ते मोल-मजुरीही करतात. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेश येथील आहे. मंगळवारी सकाळपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिच्या घरच्यांनी तिचा शोधही घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. आज तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. पेलिसांनी या चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतरच हा प्रकार नरबळीचा आहे की तिचा बलात्कार झाला आहे, हे स्पष्ट होईल. चिमुरडीचा खून कुणी आणि का केला आसावा याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Published On - 1:15 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI