नोकरीचं आमिष दाखवून गंडा, पालघरमधील ‘बंटी-बबली’ला बेड्या

नोकरीचं आमिष दाखवून गंडा, पालघरमधील 'बंटी-बबली'ला बेड्या

टीव्ही9 मराठी, पालघर : नोकरीचे आमीष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून या महिलेला अटक करण्यात आली. मिनाक्षी विलास सांबरे ऊर्फ मिनाक्षी मारुती रहाटे असे आरोपी महिलेचं नाव आहे. ती वाडा तालुक्यातील गाळे येथे रहाणारा राकेश चौरे या आपल्या साथीदाराच्या मदतीने लोकांची फसवणूक करायची. राकेश चौरे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिनाक्षी जे. जे. रुग्णालय आणि वाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर असल्याचा बनाव करायची. वाडा शहर तसेच ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवायची. त्याबदल्यात लोकांकडून 35 ते 40 हजार रुपये उकळायची. लोकं तिच्या फसवणुकीला बळी पडून नोकरीच्या लालसेपोटी तिला पैसे द्यायचे. त्यानंतर ती रुग्णालयाच्या खोट्या लेटरपॅडवर त्यांना नियुक्तीपत्र द्यायची.

आपली फसवणूक झल्याचे लक्षात आल्यानंतर या लोकांनी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांच्याकडे धाव घेतली. ज्यानंतर वनगा यांनी तक्रारदार आणि पोलिसांच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेतला.

पोलिसांनी या महिलेला तब्यात घेतले असून तिच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात अनेक ठिकाणी बेरोजगारी आहे. कित्येक तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळत नाही आहेत. याच हताश, निराश झालेल्या लोकांच्या गरजेचा फायदा मिनाक्षी सारखे आरोपी घेतात. नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत लोकांना लुटतात. प्रशासन आणि सरकार वारंवार अशा लोकांपासून सावध राहण्याचं आवाहन करत असतात. पण काही भोळेभाबडे लोक अशा फसवेगिरीला बळी पडतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI