दारू संपली अन् दोस्तीसुद्धा! मित्राच्याच डोक्यात फरशी घालून केलं ठार

पार्टी रंगायला लागली पण दारू संपली. त्यानंतर असं काही झालं की थेट मित्रानेच केली मित्राची हत्या.

दारू संपली अन् दोस्तीसुद्धा! मित्राच्याच डोक्यात फरशी घालून केलं ठार

जळगाव : जळगावमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मित्रानेच दुसऱ्या मित्राचा खून केला असल्याची माहिती समोर येत आहे. सोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (friend murder by youth for alcohol in jalgaon)

अरुण हरी पवार (वय 45, रा. के. सी. पार्क परिसर, कानळदा रस्ता, जळगाव) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 32) असं खून करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो जळगावातील इंद्रप्रस्थनगरातील रहिवासी आहे. सोमवारी रात्री साडेसात वाजेनंतर मयत अरुण, संशयित आरोपी सचिन अटवाल हे काही मित्रांसह इंद्रप्रस्थनगर परिसरात दारू पित बसलेले होते.

काही वेळानंतर त्यांच्याकडे असलेली दारू संपली. त्यामुळे पुन्हा दारू विकत आणावी, असं काही मित्र सांगत होते. त्यावेळी संशयित आरोपी असलेल्या सचिन याने अरुण याच्याकडे दारू आणण्यासाठी त्याची दुचाकी मागितली. पण अरुणने आपली दुचाकी देण्यास नकार दिला.

या गोष्टीचा राग आल्याने सचिन याने त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघेही दारूच्या नशेत असल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून हाणामारी झाली. त्यावेळी इतर मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. हाणामारीत सचिनने अरुण यांच्या डोक्यात फरशी घातली.

डोक्याला गंभीर जखम झाल्याने अरुणचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अरुणचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या –

सुशांतची पवना, मुंबईतील प्रॉपर्टी हडपण्याचा कुटुंबाचा डाव होता का?; शिवसेनेकडून चौकशीची मागणी

…तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

(friend murder by youth for alcohol in jalgaon)

Published On - 3:09 pm, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI