जुगार अड्ड्यावर छापा, पकडलेल्या ग्रामसेवकाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू

जुगार अड्ड्यावर छापा, पकडलेल्या ग्रामसेवकाचा पोलीस व्हॅनमध्ये मृत्यू

रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, हिंगोली: सेनगाव तालुक्यातील प्रसिद्ध यात्रेच्या कोळसा या गावात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून चौघांना ताब्यात घेतलं. या आरोपींमध्ये एका ग्रामसेवकाचाही समावेश होता. मात्र व्हॅनमध्ये बसवून आरोपींना पोलीस स्थानकात नेत असताना, आरोपी ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव परिसरात ही घटना घडली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल सायंकाळी कोळसा या गावात अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या धाडीत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं. तर दोघे जण फरार झाले. या चार आरोपींमध्ये 45 वर्षीय गोपाल बेंगाळ या ग्रामसेवकाचा समावेश होता. या आरोपींना व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. त्यावेळी ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांच्या नातेवाईकांनी बेंगाळ यांच्या मृत्यूसाठी पोलिसांनाच जबाबदार धरलं. कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात ठिय्या मांडत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेकडो नातेवाईक काल रात्रीपासून सेनगाव पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून बसले. जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. शिवाय सेनगाव शहरही बंद करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI