पाकिस्तानात दाऊदच्या घराबाहेर ग्रेनेड हल्ला

पाकिस्तानात दाऊदच्या घराबाहेर ग्रेनेड हल्ला

कराची: पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये चीनच्या दूतावासाजवळ दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यातील दोन दहशतावाद्यांना ठार करण्यात यश आलं, तर काही पोलिसांचाही मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे जिथे चीनचं दूतावास आहे, त्याच्या काही अंतरावरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं घर आहे. भारताचा नंबर एकचा शत्रू असलेला दाऊद इब्राहिम मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटातील प्रमुख आरोपी आहे. याशिवाय भारतातील अनेक दहशतवादी कारवांमध्येही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

दाऊद सध्या पाकिस्तानात राहतो. त्याचं घर क्लिफ्टन परिसरात आहे. त्याच्या घरापासून 150 मीटर अतंरावर चीनचं दूतावास आहे. या दूतावासाजवळ आज सकाळी तीन-चार दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

चीनचं दूतावास कराचीतील क्लिफ्टन परिसरात ब्लॉक 4 मध्ये प्लॉट नंबर 20 वर आहे. भारताकडे जो दाऊदचा पत्ता आहे, तो हाच आहे. मात्र पाकिस्तानने कधीही तो आपल्या देशात असल्याचं स्वीकारलेलं नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9.30 वा हल्लेखोरांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे दोन सुरक्षारक्षकांचाही मृत्यू झाला. तर पाकिस्तानी रेंजर्सनी तीन हल्लेखोरांना ठार केलं.  बलुचिस्तानातील फुटीरतावाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीचे प्रवक्त्याने अज्ञातस्थळावरुन न्यूज एजन्सी एएफपीला फोनवरुन याबाबतची माहिती दिली. आम्ही हा हल्ला केला, आमची लढाई सुरुच राहील, असं फोनवरुन या प्रवक्त्याने सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI