पंचगंगा कोणत्याही क्षणी धोक्याची पातळी गाठणार, राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. कोणत्याही क्षणी पंचगंगा धोक्याची पातळी गाठू शकते.

पंचगंगा कोणत्याही क्षणी धोक्याची पातळी गाठणार, राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस


कोल्हापूर :  कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. कोणत्याही क्षणी पंचगंगा धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 41.6 फूट इतकी आहे. पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली तर नदी धोक्याची पातळी गाठते. जिल्ह्यातील 80 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. तिकडे राधानगरी धरणाचे 7 पैकी 4 दरवाजे उघडले आहेत. या धरणातून प्रतिसेकंद 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून, प्रशासनाने सर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये 736 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त 105 मिलीमीटर पाऊस गगनबावडा परिसरामध्ये झाला. तर राधानगरीमध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेले आहे.

महाबळेश्वरमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस

दरम्यान गेल्या 24 तासात साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये देशातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये तब्बल 202 मिमी पाऊस एका दिवसात कोसळला.

पुण्यात पावसाने खड्डे

गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि परिसरातील  रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. रस्त्यावरील  खड्ड्यात पाण्याची डबकी साठल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होत आहेत.

सांगलीच्या दुष्काळी भागात पाऊस

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील जलसाठे भरत आहेत. ज्याप्रमाणे राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसाने धबधबे ओसंडून वाहताहेत. अगदी त्याचप्रमाणे, यावर्षी चक्क दुष्काळी सावर्डे गावात धबधबे वाहत आहेत. पानी फाऊंडेशनने केलेल्या कामामुळे दुष्काळी भागात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमधे पावसाची संततधार सुरु असल्यानं काल सलग तिसऱ्या दिवशी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी गोदाघाट परिसरात पूर कायम आहे. सकाळच्या सुमारास गंगापूर धरणातून जवळपास 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. परिणामी धार्मिक विधींसाठी आलेल्या भाविकांना रामकुंड परिसराच्या बाहेरच्या रस्त्यावरच आपले सगळे विधी उरकावे लागले.

नागपूरमध्ये पाऊस

नागपूर जिल्ह्यात पावसाने आधी दडी मारली, मात्र गेल्या तीन- चार दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली. जोरदार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेडेश्वर धरणाचे दरवाजे उघडल्याने, तसेच नांद नदीला पूर आल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं.

गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला. अहेरी तालुक्यात किष्टापूर नाल्यावर पाणी आल्याने जवळपास तीस गावांचा संपर्क तुटला.

वर्ध्यात पाऊस

मागील चोवीस तासात जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. जिल्ह्याच्या सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. पावसामुळे तळ गाठलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मागील चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टक्यांनी वाढ झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI