वर्ध्यात ट्रॅव्हल्सने नऊ वाहनांना चिरडलं, श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

वर्ध्यात ट्रॅव्हल्सने नऊ वाहनांना चिरडलं, श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

वर्धा : ट्रॅव्हल्स चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वर्ध्यात थरकाप उडवणारी घटना घडली. या भरधाव ट्रॅव्हल्सने नऊ वाहनांना धडक दिली. ट्रॅव्हल्स चालक दारु पिऊन वाहन चालवत असल्याचंही समोर आलंय. शास्त्री चौकातील पेट्रोल पंपजवळ ही घटना घडली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने थरकाप उडवला.

भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि सुरुवातीला गाडीची अल्टोला धडक बसली. ही ट्रॅव्हल्स पुढे रस्त्याच्या दुभाजकावर चढली. रस्त्याच्या दुभाजकावरून उतरून या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या नऊ वाहनांना चिरडलं.

यात सहा दुचाकी आणि दोन सायकल, तर एका कारचाही समावेश आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत खांबालाही या ट्रॅव्हल्सने टक्कर दिली. यात विद्युत खांबाचं मोठं नुकसान झालंय.

या अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक प्रवीण बोरकर याला लोकांनी चांगलंच बदडलं. प्रवीण बोरकर हा चालक नसून तो त्या गाडीवर क्लिनर होता आणि तो एकटाच गाडी चालवत होता, अशी बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि कुणाला इजाही झाली नाही.

अगदीच रेल्वे स्टेशन समोरील हा रस्ता आहे. या रस्त्याने रेल्वे गाडीच्या वेळेवर बरीच गर्दी असते. पण जेव्हा अपघात झाला तेव्हा कुठल्याही रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याची वेळ नव्हती. त्यामुळे अपघातामध्ये जीवितहानी टळली  आहे. अन्यथा एखाद्याच्या जीवावर बेतणारी ही घटना ठरली असती.

पाहा व्हिडीओ :


Published On - 4:49 pm, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI