… तर आमच्याकडे कलम 370 काढण्याशिवाय पर्याय नाही : राजनाथ सिंह

  • Updated On - 4:04 pm, Fri, 5 July 19 Edited By:
... तर आमच्याकडे कलम 370 काढण्याशिवाय पर्याय नाही : राजनाथ सिंह

श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन फुटीरतावाद्यांना कठोर संदेश दिलाय. ज्या लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून नेतृत्त्व केलं, त्यांना आज राज्यासाठी वेगळा पंतप्रधान हवाय. जर कुणी जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची मागणी करत असेल, तर आमच्याकडे कलम 370 आणि कलम 35A काढून घेण्याशिवाय पर्याय नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी सोमवारी जम्मूमध्ये जाऊन तीन सभा घेतल्या आणि भाजपच्या प्रचाराचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जम्मूमधील सूचेतगडमधील सभेत त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, त्यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधला. ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानाची मागणी केली होती.

वाचा – कलम 370 काढलं तर आम्ही भारतापासून वेगळे होऊ, फारुख अब्दुल्लांची धमकी

दहशतवाद बिलकुल खपवून घेतला जाणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कोणतीही तडजोड करु शकत नाही. जोपर्यंत देश आणि जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची खात्री होत नाही, तोपर्यंत देश आणि राज्याचा विकास होणार नाही. यासाठी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. सरकार कसं चालवावं लागतं याची आता तुम्हाला जाणीव होत असेल, असंही ते म्हणाले.

मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक क्षेत्राचा विकास केला जातोय. अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या भाजपने पूर्ण केल्या. एसपीओचा निधी वाढवलाय. एसपीओला कमी निधी मिळत असल्याचं जेव्हा समजलं तेव्हा तातडीने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागच्या सरकारला हे सर्व का नाही करता आलं, यावर सर्वांनी विचार करायला हवा, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली. क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये अपंगत्व आल्यास आर्थिक नुकसानीची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये अजून वाढ करण्यात येईल. क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये दुग्ध पशू मारले गेल्यास प्रत्येकाला 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.